१ तारखेला लग्न, ३१ ला पतीची केली हत्या; ७२ तासांत पोलिसांनी केला घटनेचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:19 AM2023-04-30T09:19:35+5:302023-04-30T09:20:06+5:30

प्रा. सचिन देशमुख हत्याकांड, वनपाल असलेल्या पत्नीला प्रियकर सोडवला नाही

In Yavatmal, the wife killed her husband with the help of her lover | १ तारखेला लग्न, ३१ ला पतीची केली हत्या; ७२ तासांत पोलिसांनी केला घटनेचा उलगडा

१ तारखेला लग्न, ३१ ला पतीची केली हत्या; ७२ तासांत पोलिसांनी केला घटनेचा उलगडा

googlenewsNext

यवतमाळ -  लग्न, सात जन्माची गाठ. दोन जिवाचं मिलन अशी समजूत आहे. लग्नामुळे नवरा-बायकोच एकत्र येत नाही तर दोन कुटुंबे जुळल्या जातात. यातून नव्या समाज निर्मितीची सुरुवात होते. दुर्दैवाने मात्र उमरखेड येथील प्राध्यापकाच्या नशिबी हे सुख आलेच नाही. १ जुलै २०१२ ला लग्न झाले अन् ३१ जुलैला वनपाल असलेल्या पत्नीने पतीची हत्या केली. एकूणच सुरुवातीला हे हत्याकांड गूढ असे वाटत होते. पोलिसांनी विविध मार्गाने तपास करत ७२ तासांत या घटनेचा उलगडा केला. पुराव्यासह वनपाल पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली.

दिग्रस पोलिसांना सिंगद येथील महिला पोलिस पाटील यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी अनोळखी मृतदेह शेतातील पुलाच्या पाण्यात पडून असल्याची माहिती दिली. त्यावरून दिग्रस पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ३० ते ३५ वर्षे वयोगटातील युवकाचा तो मृतदेह होता. त्याच्या हातावर सचिन नाव गोंदविण्यात आले होते. पोलिसांनी २ ऑगस्टला मर्ग दाखल करून तपास सुरू केला. नंतर काही वेळाने मृताची ओळख पटली. सचिन वसंतराव देशमुख (वय ३२, रा.उमरखेड) याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. सचिन बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी त्याचे कुटुंबीय उमरखेड पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना मृतदेह मिळाल्याची माहिती भेटली. त्यावरून त्यांनी तत्काळ दिग्रस पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात हर्षद नागोराव देशमुख याच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी तपास सुरू केला.

सचिनच्या शवविच्छेदनाचा अहवाल यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाला. त्यामध्ये सचिनचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. सचिनचा खून झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली. त्यासोबतच फिर्यादी हर्षद देशमुख याचा जबाब नोंदविला. त्यामध्ये सचिनच्या पत्नीवर त्याने संशय व्यक्त केला. धनश्री अशोकराव देशमुख (रा. मांजरखेडा, ता. चांदूर रेल्वे) हिच्याशी सचिनचा १ जुलै रोजी विवाह झाला होता. लग्नानंतरही धनश्री ही आकोट येथे वनपाल म्हणून नोकरी करत होती. त्यामुळे सचिन दर शनिवारी पत्नीच्या भेटीला जात होता. २९ जुलै रोजी सचिन पत्नीला भेटायला गेला. आकोट येथे पोहोचल्याची माहिती सचिनने फोनवरून त्याची बहीण सायली हिला दिली. मात्र, काही वेळानेच सचिनची पत्नी धनश्री हिने सासरे वसंतराव देशमुख यांना सचिन घरी पोहोचलाय का, अशी विचारणा केली. यामुळे संभ्रम तयार झाला. याच आधारावर पोलिसांनी धनश्री देशमुख हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिने संपूर्ण हकीकतच पोलिसांपुढे सांगितली. सचिनशिवाय तिचे शिवम चंदन बछले (रा. परतवाडा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याकरिता धनश्री सचिनला घटस्फोट मागत होती.

घटस्फोटास नकार दिल्यामुळे वाद झाले. ३१ जुलैच्या रात्री धनश्री व शिवम या दोघांनी सचिनचे हातपाय बांधून दोरीने गळा आवळला. नंतर त्याचा मृतदेह एम.एच.२७/ व्हीझेड-१८३७ क्रमांकाच्या वाहनात टाकून दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील पुलाखाली टाकला. त्यानंतर आरोपीचे कपडे, त्याचे हात बांधलेली दोरी स्कार्फ कुकरमध्ये टाकून जाळले. नंतर कुकर घासणीने साफ केला. खुनानंतर पुरावा नष्ट करण्यात शिवमचा मोठा भाऊ उपेन चंदन बछले याने मदत केली. त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. तो अजूनही फरार आहे. यातील धनश्री व तिचा प्रियकर शिवम दोघेही कारागृहात आहे.

कॉल रेकॉर्डिंग तपासले, फुटेज जप्त केले
पोलिसांनी मृतदेह घेऊन जाणारे वाहन कारंजा येथील पेट्रोल पंपावर थांबले असता, त्याचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. धनश्री देशमुख हिच्या मोबाइलमध्ये असलेले कॉल रेकॉर्डिंग तपासले. एकूणच खुनाची घटना घडली असताना त्या कालावधीतील फोन कॉलिंग हेसुद्धा पुरावा म्हणून पोलिसांनी सादर केले आहे. एकूणच या गुन्ह्याचे दोषारोपपत्र भक्कम बनविण्यासाठी विविध पुरावे लावण्यात आले आहे.

पुराव्यासह आरोपींना अटक
तपास अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक तथा दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी या गुन्ह्याचा छडा लावला, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व दिग्रस पोलिस तपासात होते. अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून पुराव्यासह आरोपींना अटक करण्यात यश मिळाले.

गुन्ह्यात वापरलेली गाडी दाखविली अपघातग्रस्त

सचिन देशमुख याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह आकोटवरून अमरावती मार्गे कारंजा (लाड), नंतर दिग्रस येथे आणला. यासाठी वापरलेली एम.एच.२७/ व्हीझेड-१८३७ ही कार अपघातग्रस्त दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गाडी डेंटिंग- पेंटिंग करण्याकरिता अमरावती येथील शोरूममध्ये लावण्यात आली होती.

Web Title: In Yavatmal, the wife killed her husband with the help of her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.