बापरे! कोट्यवधींचा खजिना असलेली सीक्रेट रुम; चावी शोधण्यासाठी IT टीमला फुटला घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:07 PM2023-10-09T16:07:45+5:302023-10-09T16:21:12+5:30
150 अधिकाऱ्यांनी 35 हून अधिक ठिकाणी ही कारवाई केली, ज्यामध्ये एकूण 26.307 किलो वजनाचे दागिने सापडले.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मयूर ग्रुपवर इन्कम टॅक्सच्या छापेमारीत 12 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोख जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपच्या मालकाने एक सीक्रेट रुम बनवली होती ज्यामध्ये हा सर्व खजिना सापडला होता. रोख रक्कम आणि सोनं ठेवलेल्या सीक्रेट रुमचे फोटो समोर आले आहेत. ही सीक्रेट रुम एका आलिशान खोलीत बनवण्यात आली होती.
व्यावसायिकाने खोलीची चावी फ्लॉवर पॉटमध्ये लपवली होती, जी शोधण्यासाठी टीमला खूप संघर्ष करावा लागला. आयटी टीमने खोलीच्या भिंतीमध्ये आरशाच्या डिझाईनमध्ये चावी लावली तेव्हा सीक्रेट रुम दिसू लागली. येथून 26 किलो सोने (8 कोटी) आणि 4.5 कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत करचोरी उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 150 अधिकाऱ्यांनी 35 हून अधिक ठिकाणी ही कारवाई केली, ज्यामध्ये एकूण 26.307 किलो वजनाचे दागिने सापडले. त्यापैकी 15.217 किलोग्राम जप्त करण्यात आले आहे. त्यांची किंमत सुमारे 8 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 4.53 कोटी रुपयांची रोकड सापडली असून त्यापैकी 3.7 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
SAFTA (South Asian Free Trade Area) मध्ये 41 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे. याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रुप मालकाची तासन्तास चौकशी केली. याशिवाय M/S KPEL कडून 18 कोटी रुपयांची बनावट खरेदी उघडकीस आली. जास्त खर्च दाखवण्यासाठी कितीही बोगस खरेदी करण्यात आली, या संदर्भात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसह समूहाच्या मालकाची चौकशी केली.
या छाप्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोख रक्कम आणि सोने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्व खोल्यांच्या चाव्या अशा ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या की, अधिकाऱ्यांना त्या शोधणे कठीण झाले होते. ज्या खोलीत जास्तीत जास्त रोकड सापडली त्या खोलीची चावी फ्लॉवर पॉटमध्ये लपवून ठेवलेली सापडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर ग्रुपने डेटा राखण्यासाठी हायटेक सॉफ्टवेअरचा वापर केला आहे, जो आयकर विभागाच्या फॉरेन्सिक टीमने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. जप्त केलेला लॅपटॉप आणि इतर उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. यानंतर करचोरीचा तपशील समोर येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.