कर चोरीच्या संशयातून नांदेडमध्ये कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:39 PM2019-09-18T16:39:59+5:302019-09-18T16:43:47+5:30
नीट, सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी नांदेडमध्ये येत आहेत.
नांदेड: शहरातील भाग्यनगर परिसरात असलेल्या नामांकित खाजगी कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यामुळे क्लासेस चालकांचे धाबे दणाणले आहेत.
मागील दोन दिवसांपासून जीएसटी विभागाचे पथक खासगी कोचिंग क्लासेसमध्ये तळ ठोकून होते. दरम्यान, बुधवारी पहाटेच पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाने नामांकित तीन ते चार क्लासवर धाडी टाकल्या आहेत. अचानक आलेल्या अधिकाऱ्यांमुळे क्लासेस व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती. दरम्यान, खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांना ऐनवेळी सुट्टी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही गोंधळ उडाला.
नीट, सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी नांदेडमध्ये येत आहेत. खासगी कोचिंग क्लासेसचा निकाल पाहता हा विद्यार्थ्यांचा लोंढा दिवसेंदिवस वाढत असून नामांकित इन्स्टिट्यूट या शहरात दाखल होत आहेत. परंतु अनेकजन शासनाचा कर बुडवत असल्याची बाब आयकर विभागाच्या लक्षात आली. त्यामुळे मंगळवारी नाशिक येथील पथकाने धाडी टाकल्या असून तपासणी सुरू आहे. पथकासोबत स्थानिक पातळीवरील कोणीही अधिकारी नव्हते तर पोलीस कर्मचारीही बीड जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. धाडीनंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी तपासणी सुरु असल्याचे सांगितले.