यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, आतापर्यंत 3 कोटींची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:53 PM2022-01-24T12:53:20+5:302022-01-24T12:53:58+5:30
IT Raids: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी व्यवसायाच्या नावाखाली हवालाचे काम करत असल्याचा संशय आहे. येथूनच हवाला व्यवसायाचे जाळे संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरले असल्याची माहिती मिळाली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election 2022) आधी आयकर विभागाने (Income Tax) राजधानी लखनऊमधील (Lucknow) रकाबगंज आणि शास्त्री नगरसह सहा व्यावसायिकांच्या ठिकाणी छापे टाकले आहेत, जे हवाला व्यवसायाशी संबंधित आहेत. यादरम्यान, 4 हवाला व्यापाऱ्यांच्या ठिकाणांहून आतापर्यंत 3 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.
आयकर विभागाचे पथक दोन हवाला व्यापाऱ्यांची चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी व्यवसायाच्या नावाखाली हवालाचे काम करत असल्याचा संशय आहे. येथूनच हवाला व्यवसायाचे जाळे संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरले असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीत अवैधरित्या पैशांचा वापर करण्यासाठी हे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांच्या परिसरातून आतापर्यंत तीन कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. शनिवारी रात्री सुरू झालेले छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या व्यावसायिकांपैकी एकाचे नाव अमित अग्रवाल असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंडाच्या कर्नलगंज कोतवाली अंतर्गत भाबुआ चौकीवर तैनात असलेल्या पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी लखनऊकडून येणाऱ्या एका कारमधून जवळपास 65 लाख रुपये जप्त केले होते. कारमध्ये असलेल्या लोकांना तपासणीदरम्यान जप्त केलेल्या रकमेचा कोणताही ठोस स्रोत सांगता आला नाही, त्यानंतर ही रक्कम निवडणुकीत वापरली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जप्त करण्यात आली आणि त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कारमधील सिद्धार्थनगरमधील रहिवासी कन्हैया अग्रवाल आणि चंदन अग्रवाल यांच्या चौकशीदरम्यान ही रक्कम हवालाशी संबंधित असलेल्या लखनऊ येथून आणल्याचे आढळून आले. यानंतर, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आयकर विभागाने पोलीस दलासह कारमधील लोकांनी सांगितलेल्या रकाबगंजमधील व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.