अक्षय कुमारच्या 'स्पेशल-२६' सारखी बनावट टीम आली अन् २५ लाख कॅशसह दागिने घेऊन गेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:09 PM2022-02-01T18:09:50+5:302022-02-01T18:11:03+5:30
बिहारच्या लखीसरायमध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या 'स्पेशल-२६' चित्रपटासारखी सिनेस्टाइल इन्कम टॅक्सची बनावट छापेमारी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
लखीसराय
बिहारच्या लखीसरायमध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या 'स्पेशल-२६' चित्रपटासारखी सिनेस्टाइल इन्कम टॅक्सची बनावट छापेमारी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील बालू ठेकेदाराच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी बनून आलेल्या सात चोरट्यांनी २५ लाख नकद आणि लाखो रुपये किमतीचे दागिने साफ केले आहेत. संबंधित घटना कबैया ठाणे हद्दीतील पंजाब नॅशनल बँकेच्या शेजारील गल्लीत घडली आहे. हे सर्व लोक बालू ठेकेदार संजय कुमार सिंह यांच्या घरी झाडाझडती घेण्याच्या बहाण्यानं आले होते.
सिंह यांच्या कुटुंबीयांच्या मनात संबंधित धाड प्रकरणाबाबत संशयाची पाल चुकचुकल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीला सुरुवात केली. संपूर्ण घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेराज कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारानं पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी बालू ठेकेदार संजय कुमार सिंह यांच्या घरी स्कॉर्पिओ गाडीतून पाच पुरुष आणि दोन महिला आल्या होत्या. घरी येताच त्यांनी घरात हत्यारं असल्याची माहिती मिळाल्याचं सांगत झाडाझडती सुरू केली. कुटुंबीयांनी याचा विरोध केल्यानंतर त्यांनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा हवाला देत कपाटाची चावी मागितली व त्यातील २५ लाख रुपये कॅश आणि लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास केले.
एसडीपीओ रंजन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कवैया ठाणे हद्दीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. घरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर गाडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून तपास केला जात असल्याचं रंजन कुमार यांनी सांगितलं.