10 लाखांची लाच घेताना प्राप्तीकर निरीक्षकास पकडले रंगेहाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:50 PM2020-12-18T14:50:30+5:302020-12-18T14:55:20+5:30
Kolhapur Crime News : लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पकडले.
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील एका डॉक्टरकडून छापा न टाकण्यासाठी तब्बल दहा लाखांची लाच घेताना प्राप्तिकर विभागाचा निरीक्षकास शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. प्रताप महादेव चव्हाण राहणार सी बोर्ड कोल्हापूर असे या संशयित निरीक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पकडले. या डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू होती या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा निरीक्षक चव्हाण यांनी दिला होता.
हा छापा टाकू नये यासाठी डॉक्टरने चव्हाण यांना विनंती केल्यानंतर यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपये लाचेची मागणी चव्हाण यांनी केली. शेवटी ही तडजोड १४ लाखांवर ठरली. मध्यरात्रीपासून ही तडजोड सुरू होती. त्याच दरम्यान संबंधित डॉक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. ठरलेल्या रकमेपैकी की दहा लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारताना चव्हाण याला लाचलुचपत विभागाने अटक केली. कारवाईच्या भीतीने इतरांच्या पोटात गोळा आणणाऱ्या प्राप्तिकर विभागातील च निरीक्षकाला लाच स्वीकारताना पकडले. विशेष म्हणजे या संशयित चव्हाण ला पोलिसांनी कार्यालयात आणल्यानंतर भोवळ आली.