वडिलांशी भांडण झाल्याने आयकर अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 04:02 PM2018-07-26T16:02:28+5:302018-07-26T16:03:56+5:30
मुंबईत आयकर विभागात निरीक्षक म्हणून काम करतात मुलाचे वडील
नवी मुंबई - वाशीच्या खाडीत मंगळवारी एका १४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. हा मृतदेह वाशी खाडीच्या काठावर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाच्या अंगावरील शाळेच्या गणवेषावरून वडिलांनी मुलाला ओळखले असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. हा मुलगा नेरुळ येथील अपेज्जी शाळेत बारावीत शिकत होता. वडिलांशी भांडण करून शाळेत गेलेला हा तरुण घरी न परतल्याने वडिलांनी नेरुळ पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती.
वडाळ्यातील अँटॉप हिल येथे राहणाऱ्या या तरुणाने वडिलांशी भांडण करून वाशीच्या खाडीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १९ जुलैला एक तरुण हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. अपेज्जी शाळेत बारावी शिकणारा हा तरुण १९ जुलै रोजी दुपारी शाळेतून निघाला आणि त्याने रिक्षा पकडली. त्याच्या शाळेतील मित्राने दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा नेहमी लोकलने प्रवास करायचा. पण नेमकं त्या दिवशी त्याने रिक्षा पकडली. शिवाय तो कोणत्यातरी विचारात होता. एरव्ही सुद्धा कमी बोलायची सवय असल्यामुळे तो त्यादिवशी अस्वस्थ का आहे ते विचारले नाही, ही माहिती त्याच्या मित्राने दिली. त्या मित्राने त्याला शेवटचे पाहिले त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नाही. तो घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. २४ जुलैला वाशी खाडी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना एक मृतदेह सापडला. मृतदेहावरील शाळेचा गणवेशावरुन या मुलाची ओळख पटली असल्याची माहिती देशमुख दिली आहे.
मृत मुलाचे वडिलांशी काही कारणावरुन भांडण झाले होते. त्याने वडिलांना मेसेज करुन मी घरी येणार नाही. घरातल्यांची काळजी घ्या, असे मेसेजमध्ये म्हटले होते. पोलिसांना या मेसेजचे लोकेशन वाशी खाडी असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. मुलाचे वडिल आयकर विभागात अधिकारी असल्यामुळे अपहरणाच्या दृष्टिने देखील हा तपास केला जात होता. पण मंगळवारी या तरुणाचा मृतदेह सापडला आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.