आदित्य ठाकरे, परबांच्या निकटवर्तीयांविरोधात दुसऱ्या दिवशी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:14 AM2022-03-10T10:14:05+5:302022-03-10T10:15:29+5:30
प्राप्तिकर विभागाकडून जप्त कागदपत्रांद्वारे चौकशी. प्राप्तिकर विभागाने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापेमारी करत झाडाझडती सुरू केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरूच होती. झाडाझडतीमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांद्वारेही पथक अधिक तपास करत आहे.
प्राप्तिकर विभागाने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापेमारी करत झाडाझडती सुरू केली होती. या कारवाईत प्राप्तिकर खात्याने कनाल यांची १५ तासांहून अधिक चौकशी केली. मध्यरात्रीच्या सुमारास पथक त्यांच्या घरातून बाहेर पडले. यादरम्यान जप्त कागदपत्रांद्वारे पथक अधिक तपास करत आहे.
दुसरीकडे बुधवारीही त्यांचे सर्च ऑपरेशन सुरु होते. यामध्ये, कनाल यांच्यासोबतच अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले संजय कदम यांच्या अंधेरीतील कैलास नगरमध्ये असलेल्या स्वान लेक या इमारतीतील घरी, तसेच पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांचे घर आणि मालमत्तांवर सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती सुरु आहे. प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईदरम्यान दस्तऐवज, कागदपत्र, डिजिटल पुरावे ताब्यात घेत त्याआधारे आर्थिक व्यवहारांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे.
तसेच अनिल परब यांचे लेखापरीक्षक (सीए) असलेल्या व्ही. एस. परब असोसिएटस यांचे घर आणि कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही प्राप्तिकर खात्याचे अधिकारी ठाण मांडून बसले असल्याची माहिती मिळते. येथूनही काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे. मुंबईत १२हून अधिक ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरु आहे.