बाबो! शेतकऱ्याच्या मुलाच्या अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार; नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:43 PM2022-03-14T18:43:45+5:302022-03-14T18:51:25+5:30
Crime News : तरुणाच्या अकाऊंटमधून 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या खंडवा येथील देशगावमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्याच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार झाल्याचं म्हटलं आहे. नोटीस मिळताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याने आपली फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण एका शेतकऱ्याचा मुलगा असून तो एक मोबाईलचं दुकान देखील चालवतो. तरुणाच्या अकाऊंटमधून 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे तरुणाच्या पॅन कार्डच्या आधारावर त्याचं मुंबईतील एक्सिस बँकेमध्ये अकाऊंट आहे. याच खात्यातून हा मोठा व्यवहार करण्यात आला आहे. या अजब प्रकारामुळे स्थानिक पोलीसही याचा तपास करत नाहीत. त्यामुळे तरुण खूपच जास्त त्रस्त आहे. प्रवीण असं या तरुणाचं नाव असून त्याला याआधी दोन नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्याने याकडे लक्ष दिलं आहे. आता तिसरी नोटीस आल्याने तो हादरला आहे. प्रवीणचं गावामध्ये एक मोबाईलचं छोटंस दुकान होतं.
प्रवीणने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावाने मुंबईमध्ये एक बनावट अकाऊंट ओपन करण्यात आलं आहे. खरं तर त्याने अद्याप मुंबई पाहिलेली देखील नाही. त्याच्या अकाऊंटमधून 300 कोटींचा व्यवहार करण्यात आला असल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. त्याचं पॅनकार्ड घेऊन ही फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत एक्सिस बँकेकडे संपर्क केला असता त्यांनी तुमच्या नावाने अकाऊंट ओपन केल्याचं सांगितलं.
एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी त्याने आपलं पॅन कार्ड दिल्याचं सांगितलं. तिथेच काही तरी घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. याबाबत अधिक तपास देखील सुरू आहे. आयकर विभागाने 300 कोटींचा व्यवहार केल्यामुळे त्याला नोटीस पाठवली आहे. प्रवीण मानसिकरित्या खूप खचला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.