नवी मुंबईत पुन्हा गुन्हेगारी कारवायांत वाढ; लॉकडाऊनमध्ये लागला होता ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:04 AM2020-08-27T00:04:46+5:302020-08-27T00:05:18+5:30
बलात्कारासह सोनसाखळी चोरी घटल्या, घरफोडीचे गुन्हे वाढले
सुर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत नवी मुंबईसह पनवेलमध्ये बलात्कार व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत थांबलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये जून महिन्यापासून पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान मागील काही वर्षांपासून पोलिसांपुढे आहे. त्यात चोरीच्या घटनांसह महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा समावेश आहे. सराईत गुन्हेगारांचा मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी कंबर कसूनही काही गुन्हे पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकलेले नाहीत. अशातच मार्च महिन्यापासून लागलेला लॉकडाऊन पोलिसांच्या पथ्यावर पडल्याने, चालू वर्षातील गुन्हेगारीचा आलेख कमी होण्यास मदत झाली आहे.
मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत बहुतांश गुन्हे शून्यावर आले होते. त्यास पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त यासह कोरोनाची भीती अशा अनेक कारणांचा समावेश होता. शिवाय बहुतांश नागरिक घरीच असल्याने चोरट्यांना चोरीच्या संधीही मिळत नव्हत्या. परिणामी, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी हे गुन्हे शून्यावर आले होते. एप्रिल व मे महिन्यात हे गुन्हे पूर्णपणे घटले होते. वाहनचोरीचे गुन्हे या कालावधीत सुरूच होते. मात्र, २०१९ सालच्या याच कालावधीतील गुन्ह्यांच्या तुलनेत हे गुन्हे निम्म्यावर आले होते. चालू वर्षात जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत सोनसाखळी चोरीचे २१ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी केवळ पाच गुन्हे एप्रिल ते जुलै अखेरपर्यंत घडले आहेत, तर २०१९ मध्ये जानेवारी ते जुलैदरम्यान ६९ घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदाचा लॉकडाऊनमुळे सोनसाखळी चोरीच्या घटना तीनपटीने कमी झाल्या आहेत.
बलात्काराच्या घटनांना बऱ्या प्रमाणात आळा बसलेला आहे. चालू वर्षात जुलै अखेरपर्यंत बलात्काराच्या ६४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी ६१ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१९ मध्ये जुलै अखेरपर्यंत १०९ घटना घडल्या होत्या. त्यापैकी १०४ गुन्ह्यांची उकल झाली होती. घरोफोडी मात्र पोलिसांची कायम डोकेदुखी राहिलेली आहे. सहा महिन्यांत घरफोडीचे १२५ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी ४४ गुन्हे हे लॉकडाऊनच्या कालावधीतच घडले आहेत. त्यापैकी केवळ सात गुन्ह्यांची उकल पोलीस करू शकलेले आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत नियंत्रणात असलेल्या घरफोडीत जुलै महिन्यात वाढ होऊन या अवघ्या एका महिन्यात २१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
बलात्कार
जानेवारी १४
फेब्रुवारी १२
मार्च ११
एप्रिल ४
मे ७
जून ८
जुलै ८
सोनसाखळी चोरी
जानेवारी ८
फेब्रुवारी ५
मार्च ३
एप्रिल ०
मे ०
जून १
जुलै ४
हत्या
जानेवारी ४
फेब्रुवारी ५
मार्च ३
एप्रिल १
मे १
जून २
जुलै ४
जबरी चोरी
जानेवारी २६
फेब्रुवारी १५
मार्च १२
एप्रिल २
मे ०
जून १०
जुलै १३
घरफोडी
जानेवारी २९
फेब्रुवारी ३६
मार्च १६
एप्रिल ८
मे ६
जून ९
जुलै २१
वाहनचोरी
जानेवारी ७२
फेब्रुवारी ८४
मार्च ५३
एप्रिल १६
मे २५
जून ६५
जुलै ६३