फसवणुकीत वाढ, तपास कागदावरच, गुन्ह्यांत १९ टक्के वाढ; गुन्हेगार पुन्हा सक्रिय; मोठ्या महानगरांतील नागरिक टार्गेटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:53 PM2022-09-01T12:53:24+5:302022-09-01T12:54:44+5:30
Crime News: देशात २०२० मध्ये कोरोना महामारीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा या गुन्ह्यांत तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात १ लाख ४५ हजार ७५४ गुन्हे घडले होते.
मुंबई : देशात २०२० मध्ये कोरोना महामारीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा या गुन्ह्यांत तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात १ लाख ४५ हजार ७५४ गुन्हे घडले होते. २०२१ मध्ये त्यामध्ये वाढ होत आर्थिक फसवणूक झालेल्यांची संख्या १ लाख ७२ हजारांवर पोहोचली आहे. फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना तपास मात्र कासवगतीने सुरू आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, बोगस कागदपत्रे तयार करून, फ्रॉड किंवा अन्य मार्गाने आर्थिक फसवणूक झालेल्या गुन्ह्यांमध्ये ८७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ लाख ५२ हजार ०७३ प्रकरणे चिटिंग आणि फ्रॉड, बोगस कागदपत्रांद्वारे फसवणुकीशी संबंधित आहेत.
एखाद्याची प्रॉपर्टी बळकवण्याचा उद्देश ठेवून फसवणूक करण्याची २१,२४१ प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर बनावट सहीने फसवणूक केल्याची ६९९ प्रकरणे समोर
आली आहेत.
मुंबईत किती गुन्हे?
देशातील प्रमुख महानगरांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. महानगरी मुंबई आर्थिक गुन्ह्यांसाठी देशात अव्वल असून, २०२१ मध्ये ५,६७१ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत ५,१०२ आर्थिक गुन्हे घडले असून, यात १४ टक्के वाढ झाली आहे. ती वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
देशात गुन्हे का वाढले?
n कोरोना साथीच्या आजाराने २०२० मध्ये देशात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते.
n नागरिक घरांमध्ये होते. त्यामुळे आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येतही घट झाली होती.
n मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.
n त्यामुळे गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले असल्याने गुन्ह्यांत वाढ झाली आहे.
न्यायासाठी करावी लागतेय प्रतीक्षा
देशात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासंदर्भात मात्र तपासच होत नसल्याचे अहवालातून समोर येते. गेल्या वर्षभरात ५५.५ टक्के आर्थिक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.
शहर फसवणूक वाढ
मुंबई ५,६७१ ४४.४%
दिल्ली ५,१०२ १४.८%
हैदराबाद ४,८६० ४१.८%
जयपूर ४,२७५ ३२.९%
लखनाै ३,४४० ५४.७%
सर्वाधिक आर्थिक फसवणूकीचे राज्ये
राज्य फसवणूक वाढ
राजस्थान २३,७५७ २८.२%
तेलंगणा २०,७५९ ६०%
उत्तर प्रदेश २०,०२६ २०%
महाराष्ट्र १५,५५० २४.८%
आसाम ११,८०९ १९.४%