"चिल्ला मत, नहीं तो मार डालुंगा", शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ!
By प्रशांत माने | Published: September 25, 2022 07:11 PM2022-09-25T19:11:53+5:302022-09-25T19:12:23+5:30
शनिवारी दिवसभरात लुटमारीच्या पाच घटना कल्याण शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण: शनिवारी दिवसभरात लुटमारीच्या पाच घटना कल्याण शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळयातील सोन्याचे ऐवज आणि पादचा-यांकडील मोबाईल लंपास केल्याने रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनांप्रकरणी महात्मा फुले चौक, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असलेतरी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
पश्चिमेकडील रामदासवाडीतील शालीनी वैद्य या सकाळी ८ वाजता साईबाबा मंदिर समोरील रोडवरून जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वैद्य यांच्या गळ्यातील ७५ हजाराची सोन्याची माळ खेचली. यावेळी वैद्य यांच्या मानेला फास लागून त्यांना घासले गेले. त्यांनी आरडाओरडा करताच त्यांना 'चिल्ला मत नही तो मार डालूंगा' अशी धमकी देत चोरटे ऐवजासह पसार झाले.
दुसरी घटना भोईरवाडी बसस्टॉपजवळ सकाळी ७ ला घडली. खुशाल चव्हाण हा धावण्याचा सराव करून सुभाषचौक मार्गे बिर्ला कॉलेज बाजुच्या रोडने जात असताना दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी भिडू तेरा मोबाईल दे दे असे ते खुशालला बोलले. खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता खुशालने विरोध केला. दरम्यान, आणखीन त्याठिकाणी दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी मोबाईल काढून घेत चौघेही पसार झाले. तिस-या घटनेत विकास गोस्वामी सकाळी सहा वाजता एपीएमसी मार्केटच्या गेटसमोरील रोडवरून पायी जात असताना त्यांच्याकडील मोबाईल देखील मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरटयांनी लांबवित पत्रीपूलाच्या दिशेने धूम ठोकली.
चौथी घटना वसंत व्हॅली याठिकाणी घडली. रचना खटवानी या येथील पपई विक्रेत्याकडे खरेदी करण्यासाठी जात असताना त्यांच्या गळयातील ५० हजार रूपये किमतीची सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली तर पाचव्या घटनेत स्नेहल सावंत यांच्या गळ्यातील २५ हजार रूपये किमतीची सोन्याची माळ मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी धुमस्टाईने चोरून नेली. ही घटना बिर्ला कॉलेजरोडवर रात्री पावणेनऊच्या दरम्यान घडली. या पाचही घटना शनिवारी एका दिवसात घडल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.