अवैध गर्भपातप्रकरणी तिघांच्या कोठडीत वाढ!
By राजकुमार जोंधळे | Published: September 28, 2024 11:15 PM2024-09-28T23:15:24+5:302024-09-28T23:15:33+5:30
परिचारिकेची न्यायालीन कोठडीत रवानगी
उदगीर (जि. लातूर) : अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश करुन, अटक केलेल्या डॉक्टरांसह इतर आरोपींना पुन्हा शनिवारी उदगीर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या पाेलिस काेठडीत वाढ केली. तर रुग्णालयातील परिचारिकेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
उदगीर शहरातील बनशेळकी रोडवर डॉ. अरीफोद्दीन उर्फ इरफान मोमीन याने त्याच्या आफिया क्लिनिकमध्ये एका महिलेचा गर्भपात करताना पथकाच्या छाप्यात रंगेहात पकडले होते. या गुन्ह्यातील तपासात रुग्ण महिलेचा पती आणि डॉक्टरला गर्भपातासाठी रुग्ण व औषधी पुरविणारा दिलीप बिरादार अशा दोघांना मंगळवारी अटक केली होती.
दरम्यान, या सर्वांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा शनिवारी उदगीर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने डॉ. इरफान मोमीन, औषध पुरविणारा दिलीप बिरादार, महिलेचा पती अशा तिघांना पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर परिचारिकेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.