भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ; ‘ईडी’चा चमू पुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 05:35 PM2021-09-03T17:35:36+5:302021-09-03T18:01:01+5:30
Increased difficulty in Bhavana Gawli : धर्मदाय आयुक्त कार्यालयातील दस्तावेजांची कसून तपासणी
वाशिम : गत महिन्यात ३० ऑगस्ट रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ‘ईडी’च्या पथकाने धाडी टाकल्या. त्याची जोरदार चर्चा अद्यापपर्यंत सुरू असतानाच ३ सप्टेंबर रोजी ‘ईडी’ त्रिसदस्यीय पथक पुन्हा वाशिम येथे दाखल झाले असून सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात धडक देऊन पथकाने गवळींच्या संस्थांशी संबंधित दस्तावेजांची तपासणी केली. यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
विद्यमान खासदार गवळी यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात विविध माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत केला होता. घोटाळ्यांसंबंधीचे सर्व सबळ पुरावे आपणाकडे असून यासंबंधी ‘ईडी’कडेही तक्रार दाखल केली, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्याच्या १० दिवसानंतरच ३० ऑगस्ट रोजी ईडीच्या चमूने खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानअंतर्गत चालणाऱ्या पाच संस्थांमध्ये धाडी टाकून दस्तावेजांची तपासणी केली. हे प्रकरण तिथेच संपुष्टात येणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र चारच दिवसांत पुन्हा ईडीचे त्रीसदस्यीय पथक ३ सप्टेंबर रोजी पुन्हा वाशिम येथे दाखल झाले. पथकाने थेट धर्मादाय आयुक्त कार्यालय गाठून महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या संस्थांशी संबंधीत दस्तावेजांची तपासणी केली. यामुळे खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मद्यधुंद तरुणीने घातला गोंधळ, रस्त्यावर केली शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/EdmxlSKAoA
— Lokmat (@MiLOKMAT) September 3, 2021
राजकीय वातावरण तापले
२० ऑगस्ट रोजी आधी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि नंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांनी खासदार गवळींवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला; तर भावना गवळी यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप केला होता. त्यानंतर काहीच दिवसांत भावना गवळी यांच्या संस्थांची थेट ‘ईडी’कडून चाैकशी सुरू झाली. लागोपाठ घडत असलेल्या या घडामोडींमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.