टाळेबंदीत वाढले अमली पदार्थांचे व्यसन, पोलिसांकडून सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:55 AM2020-08-31T00:55:19+5:302020-08-31T00:56:08+5:30
टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत.
नवी मुंबई - कोरोनामुळे लागू केलेल्याटाळेबंदीच्या काळात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे युवकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांना केले आहे.
टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत. याचा नेमका फायदा अमली पदार्थ विक्रेत्यांनी घेतला आहे. चिंता व नैराश्य घालविण्यासाठी तरुण विविध पर्यायांचा शोध घेताना दिसत आहे. ही बाब अमली पदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. सैरभैर झालेल्या तरुणवर्गाला विविध मार्गाने आकर्षित करून त्यांना अमली पदार्थांची सवय लावली जात आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळात अमली पदार्थांची विक्री व सेवन यात वाढ झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
टाळेबंदीच्या काळात पान, बिडी, सिगारेट, तसेच मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टींचे व्यसन असणाऱ्यांची पंचाईत झाली होती. टाळेबंदीतही तबांखूजन्य पदार्थ, दारूची तिप्पट दराने विक्री होत होती. त्यामुळे अनेकांनी या व्यसनाला फाटा दिला, परंतु त्याच वेळी तंबाखूजन्य पदार्थापेक्षा कमी दरात अमली पदार्थ उपलब्ध करून देण्याची शक्कल काही ड्रग्ज माफियांनी लढविली. महागड्या तंबाखूजन्य पदार्थापासून दूर गेलेल्या युवकांना एमडी, गांजा आदी अमली पदार्थ स्वस्त व सहज उपलब्ध करून देण्यात ड्रग्ज माफिया यशस्वी झाले.
अमली पदार्थांमुळे भूक वाढते, एकाग्रता वाढते, अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे, तसेच कोणीही अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी युवकांना केले आहे.