डोंबिवलीत वाढत्या चोरीच्या घटना, पोलिसांच्या आवाहनाला मिळतेय ‘तिलांजली’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:01 AM2019-11-28T01:01:21+5:302019-11-28T01:09:19+5:30
घरगुती नोकर, भाडेकरू, सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांची इत्यंभूत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळविण्याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याला घरमालकांकडून तिलांजली देण्यात येत आहे.
- सचिन सागरे
डोंबिवली : घरगुती नोकर, भाडेकरू, सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांची इत्यंभूत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळविण्याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याला घरमालकांकडून तिलांजली देण्यात येत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच नोकर, सुरक्षारक्षक हेच घरभेदी ठरत असल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या काही घटनांवरून दिसून आले आहे.
घरगुती नोकर, सुरक्षारक्षक, वाहनचालक यांचे फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, पत्ता आदींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये घरगुती नोकरांचा आढळलेला सहभाग लक्षात घेता नागरिकांनी, अशी माहिती पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते. काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तपासासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो. मात्र, ठरावीक नागरिकांनीच आपल्या नोकरांची माहिती पोलीस ठाण्यात कळवली आहे.
पूर्वेतील एमआयडीसीतील मिलापनगर परिसर म्हणजे उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथे बांधकाम व्यावसायिक, सोन्याचे व्यापारी, डॉक्टर यांच्यासारख्यांचे बंगले आहेत. त्यामुळे येथील बंगल्यांत घरकाम करणारे नोकर आणि सुरक्षारक्षकांची मागणीही जास्त असते. नोकरांनीच ऐवज लंपास केल्याच्या विविध घटनांची नोंदही गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. अनोळखी लोकांना कामावर ठेवल्यानंतर चोरीचे प्रकार घडल्यास तपास रेंगाळल्याची उदाहरणेही आहेत. बहुतांश कामगार विश्वासू आणि प्रामाणिक असल्याने मालक बिनधास्त असतात. त्यांच्या जीवावर बंगला सोडून ते बंगल्याबाहेर पडतात. पण, हा अतिविश्वास मालकांच्याच अंगलट येत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. मालकाच्या विश्वासापेक्षा त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांकडे नोकरांचे जास्त लक्ष असते. नोकरांनी हाच ऐवज घेऊन पोबारा केल्याचे प्रकार घडले आहेत.
अनेक नोकरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसते; पण त्यांना दररोज दिसणारी मोठी रक्कम, सोन्याचे दागिने या लालसेला बळी पडून ते चोरी करतात. त्यांची संपूर्ण माहिती घेऊन नोकरांना कामावर ठेवावे, असे आवाहन पोलीस करतात. पण, गुन्हा घडतो, त्या वेळी नोकराची पूर्ण माहिती मालकांकडे नसल्याचे समोर आले आहे.
माहिती न दिल्यास दंड, शिक्षा; सुशिक्षितांनाही माहिती नाही!
घरीकाम करणारे नोकर, सुरक्षारक्षक आणि भाडेकरू यांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी सक्ती करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.
पोलिसांनी ही माहिती मागितली आणि ती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांना दंड किंवा शिक्षा होऊ शकते. मात्र, या कायद्याचा सुशिक्षितांच्या शहराला विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे.
या कायद्याबाबत पुरेशी जागृती होत नसल्यामुळे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या सुशिक्षितांनाही या नियमांची माहिती नाही.