दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे; पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Published: November 20, 2022 11:20 PM2022-11-20T23:20:13+5:302022-11-20T23:20:36+5:30
२५ वर्षाच्या तरुणाचे कृत्य; वडिलांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच क्रांती चौक ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धावले.
औरंगाबाद : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घराबाहेर बोलावून घेत २५ वर्षाच्या तरुणाने तिच्यासोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार २० नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजता क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी पोक्सोसह ऑट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आसून, आरोपीस अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
संतोष विलास शिंदे (२५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोलमजुरी करणारे दाम्पत्य आपल्या दहा वर्षांची मुलगी आणि एका मुलासह क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २० नोव्हेंबरला पीडित मुलीची आई कामावर गेली होती. तर, वडील घरातच होते. पीडिता भांडे घासत होती. तेव्हा आरोपी संतोष शिंदे याने तिला आवाज देऊन, तुला छोटूने बोलावले आहे, असे म्हणाला. त्यानंतर पीडिता बाहेर गेली असता छोटू पळत होता. पीडिता त्याच्यामागे गेली असता एका दुकानासमोर आरोपी संतोष शिंदे याने पाठीमागून तिला पकडून अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. त्यामुळे घाबरलेली पीडिता पळत वडिलांकडे गेली आणि तिने घडलेला प्रसंग सांगितला.
वडिलांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच क्रांती चौक ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धावले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी संतोष शिंदे याला अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात करीत आहेत.