नायजेरियन आरोपीकडे मिळाले भारतीय आधार आणि पॅन कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 09:58 AM2022-08-04T09:58:05+5:302022-08-04T09:58:49+5:30

वसईत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ

Indian Aadhaar and PAN card obtained from the Nigerian accused | नायजेरियन आरोपीकडे मिळाले भारतीय आधार आणि पॅन कार्ड

नायजेरियन आरोपीकडे मिळाले भारतीय आधार आणि पॅन कार्ड

googlenewsNext

मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : परदेशी नागरिकांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी बनत आहे. त्यांच्याकडून गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत आहेत. आता तर वसईत नायजेरियन आरोपीकडे चक्क त्याच्या नावाचे भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडल्याचे उघड झाले आहे. याच प्रकारामुळे इतर देशांतून बेकायदा भारतात घुसखोरी केलेल्या नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. 

वसई तालुक्यातील नालासोपारा शहरामध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन आणि इतर परदेशी नागरिक राहतात. विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोडमध्ये स्वस्तात घरे मिळत असल्याने ही मंडळी येतात. याव्यतिरिक्त छुप्या पद्धतीनेही परदेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातील अनेक नागरिक हे मादक पदार्थांच्या तस्करीत आणि लॉटरी फसवणुकीच्या गुन्ह्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच गुन्ह्यातील आरोपींकडून त्यांच्याच नावाचे आधार आणि पॅन कार्ड सापडले आहे. त्यांनी ही कागदपत्रे कशी बनवली व कोणाकडून बनवली याचा शोध सुरू आहे. नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय अथवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर ते या ठिकाणी आपले बस्तान मांडून गैरधंदे करायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.

अनेक नायजेरियन नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून पुढे आले आहे. दरम्यान, काही नायजेरियन भारतात राहण्यासाठी अमली पदार्थांच्या केस करवून घेत असल्याचे अनेक वेळा बोलले जाते, तर यांना भारतात राहण्यासाठी मज्जाव केला तर काही तांत्रिक अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागते.

काही नायजेरियननी केला भारतीय महिलांशी विवाह
शहरात राहण्यासाठी काही नायजेरियन नागरिकांनी अनोखी शक्कल लढवत आर्थिक व्यवहार करून काही भारतीय महिलांशी लग्न केले आहे, तर काहींनी फक्त नावाला लग्न करून कागदोपत्री या ठिकाणी राहत असल्याचा पुरावा गोळा केला आहे. या पुराव्यासह त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड बनविले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परदेशी नागरिक किंवा कोणी अशी बनावट कागदपत्रे बनवित असेल व याबाबत कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी. जेणेकरून पोलिसांना कारवाई करता येईल. 
- विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, मुख्यालय, पोलीस आयुक्तालय

Web Title: Indian Aadhaar and PAN card obtained from the Nigerian accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.