इंडियन आयडाॅल फेम अवंतीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 07:08 PM2019-01-05T19:08:39+5:302019-01-05T19:10:44+5:30
या प्रकरणी अवंतीने सायन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. यूपीआयच्या माध्यमातून चोरट्यांनी हे पैसे चोरल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबई - इंडियन आयडाॅल फेम गायिका अवंती पटेल हिला सायबर चोरट्यांनी तब्बल पाऊणे दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी अवंतीने सायन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. यूपीआयच्या माध्यमातून चोरट्यांनी हे पैसे चोरल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सायन परिसरात राहाणाऱ्या अवंतीला ३१ डिसेंबरला दुपारी एक निनावी फोन आला. समोरील व्यक्तीने अवंतीला तुम्ही घेतलेलं बँकेचं कार्ड अद्याप सुरू का केलं नाही असा प्रश्न विचारला. त्यावर अवंतीने त्याची विचारपूस केली असता त्याने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्याने डेबिट कार्ड ऑनलाईन सुरू करण्यासाठी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. अवंतीच्या बँकेतील पैसे आणि अकाऊंट नंबरची अचूक माहिती दिल्याने अवंतीचा त्याच्यावर विश्वास बसला.त्यानंतर अवंतीने फोनवरून सर्व माहिती दिली. दरम्यान आरोपीने अवंतीला कार्डची एक्सपायरी डेट विचारत मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगण्यास सांगितलं. तो ओटीपी सांगताच तिसऱ्या मिनिटाला ३ वेगवेगळ्या ट्रांझॅक्श्नद्वारे अवंतीच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले.
चोराने उलट्याबोंबा मारण्यास सुरुवात झाली. ३ वेगवेगळ्या ट्रांझॅक्श्नद्वारे निघालेले पैसे पुन्हा खात्यावर जमा करण्यासाठी तसंच बँकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या चोरट्याने घरातील इतर सदस्यांच्या बँकेतील खात्याविषयी माहिती तिला विचारली. त्यानुसार अवंतीने आपल्या कार्डसाठी गॅरेंटर म्हणून त्याच बँकेच्या बहिणीच्या खात्याची माहिती चोरट्यांनी दिली. ही माहिती मिळताच चोरट्यांनी तिच्याही खात्यातून २० हजार रुपये काढले. बरेच तास उलटल्यानंतर देखील पैसे खात्यावर जमा न झाल्याने अवंतीने पुन्हा त्या नंबरवर संपर्क केला असता. तो फोन नंबर बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अवंतीने सायन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचं सायन पोलिसांनी सांगितलं.