५ हेक्टर जमीन, ४ दुचाकी, २ कार, अर्धा किलो सोनं, १ किलो चांदी; अभियंत्याची संपत्ती मोजून अधिकारी दमले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:37 PM2021-07-19T21:37:54+5:302021-07-19T21:49:28+5:30
भ्रष्टाचारातून अभियंत्यानं जमवलेली माया पाहून पोलीस कर्मचारी चक्रावले
इंदूर: नगरपालिकेतील सहाय्यक अभियंत्याच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात घबाड सापडलं आहे. सहाय्यक अभियंता देवेंद्र कुमार जैन यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि खासगी बंगल्यावर लोकायुक्त पोलिसांनी पहाटे साडे पाचच्या सुमारास धाड टाकली. या अभियंत्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली आहे. ४० वर्षांच्या सेवेतून जैन यांना ९० लाख रुपये वेतन मिळालं. मात्र त्यांच्या घरावर, बंगल्यावर आणि मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमधून कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा उलगडा झाला आहे.
जैन यांच्या धारमधील निवासस्थानातून ५ कोटींची संपत्ती पोलिसांच्या हाती लागली. त्यात सोनं आणि चांदीचा समावेश आहे. तर इंदूरमधील संपत्तीचं मूल्य १ कोटी आहे. जैन यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याची माहिती डीएसपी शिवसिंह यादव यांनी दिली. इंदोरमधील एका आणि धारमधील दोन ठिकाणी अचानक टाकण्यात आलेल्या छाप्यांमधून लोकायुक्तांच्या हाती बरीच महत्त्वाची माहिती लागली. छापे टाकत असताना २६ महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.
धारच्या महागड्या वसाहतीत जैन यांचं एक घर आहे. तर इंदूरमध्ये एक घर आहे. धारमध्ये विविध ठिकाणी त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. तिचा एकूण आकार ५ हेक्टर आहे. याशिवाय कुटुंबियांच्या नावावरदेखील बरीच संपत्ती असल्याची माहिती मिळाली आहे. सहाय्यत अभियंता असलेल्या जैन यांच्याकडे ४ दुचाकी आणि २ कार आहेत. याशिवाय अर्धा किलो सोन्याचे आणि एक किलो चांदीचे दागिने आहेत. आतापर्यंत एकाही बँक लॉकरची माहिती मिळालेली नाही. सध्या १४ बँक खात्यांची माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे.