२ बंगले, ६ दुकान, सोने अन् लाखोंची रोकड; छापेमारीत सापडला कोट्यधीश 'तलाठी'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:21 PM2023-04-28T13:21:01+5:302023-04-28T13:21:51+5:30
खरगोन जिल्ह्यात कार्यरत असलेला तलाठी जितेंद्र सोलंकी याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली
खरगोन - मध्य प्रदेशातील खरगोन इथं उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी एका तलाठ्याच्या घरासह अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. यात तपास यंत्रणांना कोट्यवधीची संपत्ती सापडली. छापेमारीवेळी ४ लाख रोकड, सोने-चांदी, इंदूरमध्ये ६ दुकाने, खरगोनमध्ये दुकान आणि २ शहरात कोट्यवधीचा बंगला, चारचाकी, गावात ३ दुकाने आणि शेतजमीन इतकं आढळून आले. सध्या या संपत्तीचा आढावा घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरगोन जिल्ह्यात कार्यरत असलेला तलाठी जितेंद्र सोलंकी याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर इंदूर लोकायुक्तांनी तलाठ्याच्या गौरीधाम येथील घरासह ४ ठिकाणी धाड टाकली. यावेळी तपासात तलाठ्याच्या घरी ४ लाखांची रोकड, सोने-चांदी, इंदूरच्या चंदन नगर भागात ६ दुकाने, इंदूरमध्ये १ फ्लॅट, खरगोनमध्ये दुकान, ईश्वरीनगर येथे ३ मजली घर, १ चारचाकी त्याचसोबत अन्य मालमत्ता आढळून आली.
इंदूर येथील लोकायुक्त डीएसपी संतोष भदौरिया आणि प्रविण बघेल यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. तलाठ्याविरोधात तक्रार मिळाल्यानंतर तपास यंत्रणेच्या २२ अधिकाऱ्यांच्या पथकाने एकाचवेळी ४ ठिकाणी धाड टाकली. टीमने रात्री ३ वाजता तलाठी जितेंद्र सोलंकी याच्या गोगांवा येथील घरी धडक दिली. छापेमारीत अधिकाऱ्यांना आढळून आलेली मालमत्ता पाहून अनेकांचे डोळे दिपले. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने आता या प्रकरणाची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.
२६ वर्षाच्या नोकरीत जमा केली संपत्ती
गेल्या २६ वर्षापासून जितेंद्र सोलंकी तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्यातून इतकी बेनामी संपत्ती जमवली आहे. ही संपत्ती कशी कमावली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. जितेंद्र सोलंकी हे हल्का नंबर ३६ येथे तलाठी होते. सध्या सोलंकी यांच्याकडे सापडलेल्या मालमत्तेची यादी बनवली जात आहे. हा प्राथमिक तपास असून पुढील कार्यवाही सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. छापेमारीवेळी तपास पथकाने इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त केली. परंतु अद्याप सोलंकी यांचे बँक खाते आणि लॉकर याचीही चौकशी बाकी आहे. त्यामुळे या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे असं अधिकारी म्हणाले.