इंदोरीकर महाराजांनी केली तक्रार दाखल, पोलिसांनी 25 ते 30 यू ट्यूब चॅनेल्सना धाडल्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 07:58 PM2021-04-11T19:58:20+5:302021-04-11T19:59:33+5:30
Indorikar Maharaj lodged a complaint : पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्याकडून काही यू टुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर यांना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यासंबंधातील खटल्यातून कोर्टाने दिलासा मिळाला होता. मात्र, इंदोरीकर यांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्याकडून काही यू टुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला भारतीय तंत्रज्ञान कायदा कलम 66, 66 सी, 43 आय आणि भा.दं.वि.कलम 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 रोजी तक्रार दाखल केली होती.
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास कोरोना प्रादुर्भावामुळे संथ गतीने सुरु होता. मात्र, फेब्रवारीपासून तपास जलद गतीने चालू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4 हजार किर्तनाच्या व्हिडीओच्या यू ट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत. पोलिसांकडून 25 ते 30 मोठ्या यू ट्युब चॅनेलला नोटीस पाठवल्याची माहिती आहे.
इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांचं कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा यू ट्युब चॅनेल नसल्याचं म्हटलं होतं. किर्तनामध्ये समाजप्रबोधनाच्या भावनेतून बोलतो. यू टयुब चॅनेलवरुन माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका यू टुयब चॅनेलच्या चालकांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचे देखील इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे आणि व्हिडीओमध्ये छेडछाड करुन प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत केली होती.
या प्रकरणात इंदोरीकर यांना मिळालेला दिलासा
इंदोरीकर यांनी एका कीर्तनात गर्भलिंग निदनाबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे इंदोरिकर यांच्याविरुद्ध गर्भलिंग निदान व प्रसूतिपूर्व लिंगनिदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये करवाई करा अशी तक्रार अंधश्रद्धा निमूर्लन समितीने केली होती. जिल्हा आरोग्य विभाग या विरोधात कारवाई करत नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या विरोधात देखील तक्रार करण्याचा इशारा समितीच्या जिलाध्यक्ष रंजना गवांदे यांनी दिला होता. त्यानंतर संगमनेर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर यांनी संगमनेर येथील न्यायालयात फिर्याद दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत खटला चालविण्याचा (इश्यू प्रोसेस) आदेश केला होता. त्याविरोधात इंदोरीकर यांनी संगमनेर येथील सत्र न्यायालयात अपिल दाखल केले. त्यांच्या वतीने ॲड. के.डी. धुमाळ यांनी युक्तिवाद केला.