मेडिकलला अॅडमिशन करून देण्याचे आमिष : १५ लाख रुपये हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:37 AM2020-02-14T00:37:20+5:302020-02-14T00:38:02+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशातील एका महिला डॉक्टरकडून दोन भामट्यांनी १५ लाख रुपये हडपले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशातील एका महिला डॉक्टरकडून दोन भामट्यांनी १५ लाख रुपये हडपले. उमेश डोंगरे (रा. साकूर, शहापूर, जि. गोरखपूर) आणि आयुष पांडे (रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
उत्तरप्रदेशमधील पत्रकारपूरम राप्तीनगर (जि. गोरखपूर) येथील डॉ. रिता पी. गौतम (वय ४८) यांनी सीताबर्डी ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उमेश आणि आयुष या दोघांनी डॉ. रिता गौतम यांच्याशी सप्टेंबर २०१८ मध्ये संपर्क केला. तुमच्या मुलीची नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) अॅडमिशन करून देतो, अशी त्यावेळी आरोपींनी थाप मारली. त्या बदल्यात १५ लाखांचा खर्च येईल, असेही आरोपी म्हणाले. डॉ. गौतम यांना नागपुरात आणले आणि सीताबर्डीतील हनुमान गल्लीत असलेल्या हॉटेल सन स्टार (मोदी नंबर ४) मध्ये थांबून डॉ. गौतम यांच्याकडून आरोपींनी १५ लाख रुपये घेतले. २० सप्टेंबर २०१८ ते ७ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत हा व्यवहार झाला. त्यानंतर मात्र आरोपी अॅडमिशन करून देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. दोन वर्षे झाली तरी त्यांनी अॅडमिशन करून दिली नाही. रक्कमही परत केली नाही. आरोपी उमेश डोंगरे आणि आयुष पांडे या दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांकडे डॉ. गौतम यांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.