अल्पवयीन साथीदारांनीच केला कुख्यात इंदलचा गेम : नागपुरात खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 10:01 PM2021-04-26T22:01:14+5:302021-04-26T22:24:18+5:30
Murder, crime news उत्तर नागपुरातील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात इंदल ऊर्फ इंद्रजित विक्रम बेलपारधी (वय ३५) याची हत्या करणारे त्याचेच जुने साथीदार निघाले. वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात इंदल ऊर्फ इंद्रजित विक्रम बेलपारधी (वय ३५) याची हत्या करणारे त्याचेच जुने साथीदार निघाले. वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना दुचाकीचा कट लागला होता, त्यामुळे आरोपींचा इंदलसोबत वाद झाला. त्या वादातून त्यांनी इंदलची हत्या केल्याची माहिती पाचपावली पोलीस सांगत आहेत. मात्र, हे अर्धसत्य असल्याची चर्चा आहे. कुख्यात इंदल गेल्या अनेक वर्षांपासून पाचपावलीत बेदरकारपणे जुगार अड्डा चालवित होता. त्याने दोघांची हत्या केली होती. इतरही अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने उत्तर नागपुरातील गुन्हेगारी वर्तुळात इंदलचा मोठा दरारा होता. पोलिसांना मोठी देण देऊन इंदल बेदरकारपणे जुगार अड्डे चालवायचा. इंदलच्या जुगार अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने मोठ्या संख्येत जुगारी त्याच्याकडे हजारोंचा डाव खेळायला येत होते. त्यातून इंदलला हजारोंची नाल (कट्टा) मिळत होता. जुगार अड्ड्यावर त्याने अनेक अल्पवयीन मुले ठेवली होती. ते मुखबिरी आणि आर्थिक व्यवहार सांभाळत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, इंदलच्या अड्ड्यावरच हे दोघे आरोपी काम करायचे. त्यांनी पैशाची अफरातफर केल्याने इंदलने त्यांची बेदम धुलाई केली होती. त्यामुळे ते सुडाने पेटले होते. या पार्श्वभूमीवर, त्यांनी रविवारी रात्री दारूच्या नशेत टुन्न असलेल्या इंदलला घेरले अन् तलवार तसेच चाकूचे सपासप घाव घालून त्याचा गेम केला.
२० पेक्षा जास्त घाव
इंदल क्रूर स्वभावाचा होता. तो वाचला तर जिवंत सोडणार नाही, हे माहीत असल्याने आरोपींनी इंदलवर आधी तलवारीने घाव घालून त्याला हतबल केले आणि खाली कोसळताच त्याच्या शरीराला चाकूने भोसकले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी इंदलवर २० पेक्षा जास्त घाव घातले. विशेष म्हणजे, या हत्याकांडात हे दोनच आरोपी असल्याचे पाचपावली पोलीस सांगत आहेत. मात्र, त्यांना पुढे करून सराईत गुन्हेगारांनी इंदलचा गेम केल्याची जोरदार चर्चा आहे.
‘सैया भये कोतवाल, फिर डर काहे का’
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे कडक निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. त्या भागातील गुन्हेगारांवर खास नजर ठेवण्याचेही सांगितले आहे. मात्र, पाचपावलीतील अनेक कुख्यात गुन्हेगार मोकाट आहेत. जुगार अड्डे, दारूचे गुत्ते, मटका अड्ड्यांसह अनेक अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. ‘सैया भये कोतवाल, फिर डर काहे का’ अशा अविर्भावात पाचपावलीत अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी पाचपावली पोलीस ठाण्याकडे कसे लक्ष घालतात, त्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.