लोकल डब्यात अर्भक सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:13 PM2019-06-03T14:13:43+5:302019-06-03T14:21:51+5:30
हे बाळ सात दिवसांचे असून मुलगा आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मुंबई - लोकल डब्यात सात दिवसांचे नवजात बाळ सापडल्याची घटना नुकताच घडली. यावेळी रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांनी पुढाकार घेऊन बाळाला रुग्णालयात दाखल करून बाळ सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी भाइंदर येथून चर्चगेट दिशेकडे धिम्या मार्गावर लोकल जात होती. लोकल दादर स्थानकावर आली असता, पहिल्या डब्यात बेवारस पिशवी असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या पिशवीची तपासणी केल्यावर यात नवजात अर्भक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ सायन रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी धाव घेतली. त्यामुळे या सात दिवसांच्या बाळाला जीवनदान मिळाले. रेल्वे पोलीस आता बाळाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पालकांचा शोध घेत आहेत. सायन रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत. हे बाळ सात दिवसांचे असून मुलगा आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
दादर स्थानकावर गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रामवतार गुर्जर आणि लखन लाल सैनी यांनी कपड्यात बांधलेल्या बाळाला आणले. त्यानंतर, बाळाला रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस निरीक्षक जे. पी. मीना यांनी दिली.