सिक्स पॅकच्या नादात घोड्याचं इंजेक्शन घेतलं, बॉडी बनवणारा युवक थेट रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 04:52 PM2022-11-25T16:52:19+5:302022-11-25T16:53:27+5:30
पीडित युवक जयसिंह याने पोलिसांनी सांगितले की, त्याने मोहित पाहूजा यांच्याकडून मॉस गेनर प्रोटीन पावडर, इंजेक्शन आणि काही गोळ्या खरेदी केल्या होत्या
मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉडी बनविण्याच्या नादात तरुणाने जीवाशी खेळ केल्याची घटना घडली. सुंदर दिसण्यासाठी मुली सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. तर, बॉडी बनविण्यासाठी मुलेही जीम आणि सप्लीमेंट फूड वापरतात. इंदौरमधील एका युवकाने अशीच सिक्स पॅक बनवण्याच्या नादात जीव धोक्यात घातला होता. या तरुणाने बॉडी बनविण्यासाठी सुरुवातील प्रोटीन पाऊडर घेणे सुरु केले. मात्र, पकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, दुकानाराविरुद्ध तक्रार दाखल करुन त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित युवक जयसिंह याने पोलिसांनी सांगितले की, त्याने मोहित पाहूजा यांच्याकडून मॉस गेनर प्रोटीन पावडर, इंजेक्शन आणि काही गोळ्या खरेदी केल्या होत्या. मात्र, शरीरयष्टी वाढविण्यासाठीच्या या गोळ्या चुकीच्या निघाल्या, या औषधांमुळे त्याच्या पोटात दुखू लागले, तसेच त्याला उलट्याही झाल्या. विशेष म्हणजे जय सिंह याने मोहितला सप्लीमेंटसाठी मोठी रक्कमही दिली होती. मात्र, मोहितने नकली सप्लीमेंट दिली. त्यामुळेच, तब्येत बिघडल्याचा आरोप जय सिंहने केला आहे.
जय सिंह हा अगोदर विजयनगर येथे राहत होता. गौरीनगर येथे जीमला येणे-जाणे होत. त्यातूनच मोहितच्या दुकानाची माहिती त्याला मिळाली. मात्र, जयने या ठिकाणी प्रोटीन घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला काही इंजेक्शनही देण्यात आले, जे इंजेक्शन बाजारात प्रतिबंधित आहेत. त्यामुळे, पोलिसांनी मोहितविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, पोलीस चौकशीत मोहितने माहिती दिली. त्यानुसार, पाळीव प्राण्यांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनपासून प्रोटीन औषधे व गोळ्या बनविण्यात येत होत्या. काही रुपयांत ते तयार करुन महागात विकण्यात येत.