'त्या' फार्म हाऊस मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू, मावळ तालुक्यात घटनेनंतर उडाली होती खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:55 AM2020-07-30T11:55:45+5:302020-07-30T11:57:06+5:30
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवून दोघांनी केला होता गोळीबार
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील नागाथलीजवळ गोळीबार झालेल्या वहाणगावातील संकल्प फार्मचे व्यवस्थापक मिलींद मणेरीकर यांचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बुधवारी (दि. २२) मणेरीकर महिंद्रा एक्सयुव्ही गाडीने तळेगाव वरून फार्महाऊसकडे जात असताना नागाथलीतून फार्महाऊसेच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात त्यांच्या पोटाला तीन गोळ्या लागल्या होत्या तर एक गोळी मानेला लागून गेली होती. त्यांना तातडीने सोमाटणेतील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती साथ देईना म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी मंगळवारी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवसांच्या उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवस होऊनही अद्याप हल्लेखोरांचा तपास लागला नाही. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेचे वतीने हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप कोणताच सुगावा लागला नाही. मणेरीकर यांच्या मागे पत्नी , दोन मुले असा परिवार आहे.