निर्दयीपणा ! मुलाने केली वयोवृद्ध आईची जमिनीवर डोकं आपटून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 06:51 PM2019-03-30T18:51:00+5:302019-03-30T18:58:26+5:30
भाईंदर पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक केली आहे.
भाईंदर - भाईंदरमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षीय मुलाने भांडणामुळे आपल्या ७० वर्षीय वयोवृद्ध आईचे डोके जमिनीवर आपटून निर्घृण हत्या केली आहे. भाईंदर पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक केली आहे.
भाईंदर पश्चिम येथील मांडवी तलाव परिसरातील प्रतीक्षा इमारतीत सोमनाथ मित्र व त्याची आई रमा मित्र हे दोघेजण भाडे तत्वावर गेले दीड वर्ष राहत होते. त्यांच्यात घरगुती वादातून नेहमीच भांडणाचे खटके उडत असत. भाईंदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी मायलेकांमध्ये भांडण सुरू झाल्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला. त्यानंतर जोरजोरात भांडणाचा आवाज आला. घराचे दार बंद असले तरी आतमध्ये मुलगा आईला मारत असल्याचा तसेच आईचा ओरडण्याचा आवाज येत असल्याचा अंदाज शेजाऱ्यांना आला होता. दरम्यान, आवाज थांबला असला तरी आतमध्ये काहीतरी विपरीत घडल्याचा संशय शेजाऱ्यांना आला. त्यामुळे त्यांनी घाबरून घराला बाहेरून कडी लावून घेतली आणि पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कडी उघडून आत प्रवेश केला आणि त्यांना धक्कादायक प्रकार समोर दिसला. सोमनाथ याने आपली आई रमा हिचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली होती. रमा या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्या होत्या. तसंच सोमनाथ शांतपणे समोर बसून होता. पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून रमाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठविला आहे. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव पुढील तपास करत आहेत.