कांदिवली बोगस लसीकरणाची  मुंबई महापालिकेमार्फत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:44 AM2021-06-17T09:44:05+5:302021-06-17T09:44:30+5:30

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात; अहवाल सादर करण्याचे निर्देश 

Inquiry into Kandivali fake vaccination by Mumbai Municipal Corporation | कांदिवली बोगस लसीकरणाची  मुंबई महापालिकेमार्फत चौकशी

कांदिवली बोगस लसीकरणाची  मुंबई महापालिकेमार्फत चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली येथील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत बोगस लसीकरण शिबिर घेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. ४८ तासांमध्ये या प्रकरणाचा अहवाल सादर होणार आहे.

    हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. संबंधितांनी सोसायटीतील सदस्यांची भेट घेऊन स्वतःला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याची ओळख सांगितली. सोसायटीत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दाखविली. त्यानुसार सोसायटीतील सदस्यांकडून १२०० रुपये देऊन लस देण्यात आली.मात्र लसीकरण झाल्यानंतर याबाबत कोणताही मेसेज सदस्यांच्या मोबाइलवर आला नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या रुग्णालयांची प्रमाणपत्र देण्यात आली होती. यामुळे नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. 

   सुरुवातीला नागरिकांना वेगवेगळ्या तारखा आणि ठिकाणं असलेली प्रमाणपत्र देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.लसीकरण शिबिर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे नाव सांगून घेण्यात आले होते. मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना नानावटी, लाइफलाइन, नेस्को पालिका लसीकरण केंद्र अशा वेगवेगळ्या नावाने प्रमाणपत्र देण्यात आले होते. 

  तसेच लस घेतल्यानंतर एकही सदस्यांमध्ये साइड इफेक्ट दिसून आले नाहीत. यामुळे सोसायटीतील लसीकरण झालेल्या नागरिकांची शंका बळावली. त्यांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचे रुग्णालयांनी सांगितले. लसीकरण झालेल्या रहिवाशांना नेस्को पालिका लसीकरण केंद्र अशा वेगवेगळ्या नावाने प्रमाणपत्र देण्यात आले होते. 

सोसायटी - रुग्णालयांमध्ये सामंजस्य करार अपेक्षित
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र पालिका प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिमंडळ सातचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. ४८ तासांमध्ये अहवाल येणे अपेक्षित आहे. दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गृहनिर्माण सोसायटी आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाबाबत सामंजस्य करार करण्याची अट महापालिका प्रशासनाने ठेवली आहे.

Read in English

Web Title: Inquiry into Kandivali fake vaccination by Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.