पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात, ७० हजारांची घेतली लाच
By सुनील काकडे | Published: November 25, 2022 03:26 PM2022-11-25T15:26:15+5:302022-11-25T15:26:33+5:30
ही कारवाई अमरावती येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने २५ नोव्हेंबर रोजी केली.
वाशिम : तक्रारदार व त्याचा मित्र चालवत असलेल्या शिवभोजन थाळी केंद्राचे थकीत देयक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यासाठी वाशिम तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी निलेश विठ्ठलराव राठोड यांनी ८० हजारांची लाच मागून ७० हजार रुपये खासगी इसमामार्फत स्वीकारले. ही बाब सिद्ध झाल्याने निलेश राठोड आणि खासगी इसम अब्दुल अकिब अब्दुल अकील (२५, रा. सौदागर पुरा, जैन मंदिरानजिक, वाशिम) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अमरावती येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने २५ नोव्हेंबर रोजी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवभोजन थाळी केंद्राचे थकीत असलेले देयक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे काम निरीक्षण अधिकाऱ्यांकडे असते. ते लवकर पाठविण्यासाठी निरीक्षण अधिकारी ८० हजारांची लाच मागत असल्याची तक्रार २१ नोव्हेंबर २०२२ रोजी अमरावतीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली. त्यावरून २१ नोव्हेंबर आणि २२ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही करण्यात आली. यादरम्यान राठोड यांनी तक्रारदार व त्याच्या मित्राला प्रत्येकी ३५ हजार याप्रमाणे ७० हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यांनतर लाचलूचपत विभागाने २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पंचासमक्ष तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सापळा रचला. यादरम्यान निरीक्षण अधिकारी राठोड यांनी अब्दुल अकिब अब्दुल अकिल या खासगी इसमामार्फत कार्यालयातच रक्कम स्विकारल्याने दोघांनाही लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. नमूद आरोपिंवर वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईमुळे प्रशासकीय विभागात कार्यरत लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.