इन्स्टाग्राम फ्रेंडकडून झालं ब्लॅकमेलिंग, लग्न ठरलेल्या तरुणीकडे केली पैशांची मागणी
By योगेश पांडे | Published: February 6, 2024 04:39 PM2024-02-06T16:39:59+5:302024-02-06T16:40:45+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणीशी व्हॉट्सअप चॅटिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत रत्नागिरीतील एका आरोपीने तिला पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
जफर मस्जिद अरकाने (३८, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची डिसेंबर महिन्यात एका २२ वर्षीय तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. जफरने तिच्याशी नियमित चॅटिंग सुरू केले व तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने व्हॉट्सअपवर बोलणे सुरू केले. दरम्यान, तरुणीचे दुसऱ्या मुलाशी लग्नदेखील ठरले. तो तिला भेटण्यासाठी आला व सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिला भेटला. त्याने तिचे फोटोदेखील काढले. त्यानंतर त्याने ते फोटो व व्हॉट्सअप चॅट व्हायरल करत तिचे लग्न तोडण्याची धमकी दिली. त्याने तिला १० हजारांच्या खंडणीची मागणी केली. तरुणीने नातेवाईकांना या प्रकाराची माहिती दिली. तिने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी जफरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.