आंतरराज्यीय सट्टा रॅकेटचा पर्दाफाश! अकाेला गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ३३ जणांना बेड्या
By आशीष गावंडे | Updated: February 19, 2025 23:17 IST2025-02-19T23:17:10+5:302025-02-19T23:17:50+5:30
कारवाईत पोलिसांनी ११३ मोबाईल, १२ लॅपटॉप, दोन पासपोर्ट, आणि एटीएम कार्ड केले हस्तगत

आंतरराज्यीय सट्टा रॅकेटचा पर्दाफाश! अकाेला गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ३३ जणांना बेड्या
आशिष गावंडे, अकोला: युवकांना व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जुगार खेळण्याचे आकर्षण दाखवून पैसे लुबाडणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे. या रॅकेटमधील ३३ जणांना बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड येथील एका फार्म हाऊसवर अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी गाेपनिय माहितीच्या आधारे १८ फेब्रुवारी रोजी रात्री, कातखेड शेत शिवारातील रविंद्र विष्णुपंत पांडे यांच्या फार्म हाऊसवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ११३ मोबाईल, १२ लॅपटॉप, दोन पासपोर्ट, आणि एटीएम कार्ड हस्तगत केले. त्याच बरोबर तांत्रिक विश्लेषणाद्वारे ५४ बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्या संदर्भात सखोल तपास सुरू आहे. आंतरराज्यीय ऑनलाइन सट्टा रॅकेट चालवणाऱ्या या टोळीने क्रिकेटसह विविध खेळांवर सट्टा लावण्यासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. आरोपी ग्राहकांकडून फोन पे आणि अन्य ऑनलाइन पद्धतीने पैसे घेऊन, त्यांना सट्ट्याच्या वेबसाइटवर समाविष्ट करत होते. आरोपींविरुद्ध बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात कलम ३१८ (४), ११२ (२), ३(५) बीएनएस सहकलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आराेपी ताब्यात
या प्रकरणात मुख्य आरोपी संजय नामनारायण गुप्ता आणि फार्म हाऊस मालक रविंद्र विष्णुपंत पांडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये ३३ आरोपी सहभागी होते. त्यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, चंद्रपूर, पुणे, मुंबई, अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे.