आंतरराज्य दरोडेखोरांची ‘टकटक’ अखेर बंद, बँक लुटण्यापूर्वी नऊ दरोडेखोरांना केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:27 AM2019-06-26T01:27:55+5:302019-06-26T01:28:03+5:30
पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातील एक बँक लुटण्यासाठी आलेल्या टकटक टोळीच्या मुख्य सूत्रधारासह नऊ दरोडेखोरांना कल्याण परिमंडळ ३ च्या चोरीप्रतिबंधक पथकाने अटक केली
कल्याण - पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातील एक बँक लुटण्यासाठी आलेल्या टकटक टोळीच्या मुख्य सूत्रधारासह नऊ दरोडेखोरांना कल्याण परिमंडळ ३ च्या चोरीप्रतिबंधक पथकाने अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दरोडेखोरांविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू येथे ५० पेक्षा अधिक गुन्हे तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २० गुन्हे दाखल आहेत.
घरफोडी व सोनसाखळी चोरांना शोधण्यासाठी कल्याण परिसरात पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे हे पथकासह मंगळवारी गस्त घालत होते. यावेळी एका दुचाकीवरून संशयास्पद फिरणाऱ्या इलीयाराज केशवराज (३०, रा. चेन्नई) याला पथकाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने टोळीचा सूत्रधार सालोमन लाजर गोगुला (२९, आंध्र प्रदेश) हा साथीदारांसह पश्चिमेतील मुरबाड रोडवरील एक राष्ट्रीयकृत बँक लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी बँकेच्या परिसरात सापळा रचला. बँक लुटण्यासाठी सालोमन, संजय नायडू (२५, रा. चेन्नई), बेन्जीमन इरगदीनल्ला (२६), दासू बाबू येड्डा (२८), अरुणकुमार पेटला (२४), राजन गोगुल (४६), मोशा याकुब मोशा (३०), डॅनियल अकुला (२५, सर्व रा. आंध्र प्रदेश) हे येताच त्यांना पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. यावेळी काही दरोडेखोरांनी पोलिसांशी झटापट करून त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला.
दरोडेखोरांकडून तीन मोटारसायकल, कोयते, मिरची पावडर, चाकू, नायलॉन रस्सी, कटावणी, खाजखुजली पावडर, लोखंडी गोळ्या (छरे), काचकटर, स्क्रू ड्रायव्हर, मोबाइल, सीमकार्ड, सेफ्टी हेल्मेट आणि रिफ्लेक्टर जॅकेट, असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीप्रतिबंधक पथकाचे उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दीपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, भावसार, रवींद्र हासे, शिपाई चिंतामण कातकडे, सुनील गावित यांनी कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे करीत आहेत.
मोबाइल, सीमकार्ड तोडून पलायन
दोन वर्षांपासून घटनेच्या ठिकाणी मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या सर्वांच्या मागावर होते. घटनेच्यावेळी, एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाइल अथवा सीमकार्ड तोडून त्या शहरातून पळून ते दुसºया शहरात जात होते.
पोलिसांसह इतरांना आपला संशय येऊ नये म्हणून हे सर्वजण सेफ्टी हेल्मेट आणि रिफ्लेक्टर जॅकेट वापरून बांधकाम कामगार असल्याचे भासवत होते.
मोटारीतील रोकडही लुटली
दरोडेखोरांविरोधात राज्यातील औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नागपूर, गोंदिया तसेच कर्नाटक राज्यात ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
अंगावर घाण किंवा खाजखुजली टाकून किंवा छोट्या बेचकीच्या आधारे मोटारीची काच फोडून त्यातील रोकडही ते लुटत असत.