अरे देवा! 'फर्जी' वेब सीरिज पाहून पेंटरने छापल्या खोट्या नोटा; अखेर 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:56 AM2023-10-07T10:56:47+5:302023-10-07T11:02:22+5:30
एका टोळीनेही खोट्या नोटांचा धंदा सुरू केला होता, ज्याचा आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
काही दिवसांपूर्वी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर एक वेब सिरीज रिलीज झाली होती. फर्जी असं या वेब सीरिजचं नाव आहे. या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाहिद कपूर पैशांच्या कमतरतेमुळे बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरू करतो. मनोरंजनासाठी बनवलेली ही वेब सिरीज पाहून दिल्लीतील एका टोळीनेही खोट्या नोटांचा धंदा सुरू केला होता, ज्याचा आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचा म्होरक्या शकूरने फर्जी वेब सिरीज पाहिल्यानंतर खोट्या नोटा छापण्यास सुरुवात केली. राजस्थानच्या नागौर येथे राहणार्या शकूरने वेब सीरीजपासून कल्पना घेऊन स्वतःची टोळी तयार केली. शकूरने आपल्या टोळीत लोकेश, शिव, संजय आणि हिमांशू जैन यांसारख्या लोकांचा समावेश केला होता. त्यानंतर या लोकांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. ही टोळी दिल्ली एनसीआरमध्येही खोट्या नोटा विकायची. हे लोक छोट्या व्यावसायिकांना खोट्या नोटा विकायचे.
दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सर्वप्रथम टोळीचा म्होरक्या शकूरला दिल्लीतील अक्षरधाम मंदिराजवळ पकडलं. त्यानंतर त्याच्या माहितीवरून संपूर्ण टोळीला राजस्थानमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 19 लाख रुपयांच्या खोट्या नोटा जप्त केल्या आहेत. ASI राज्यपाल आणि ASI अजय चौहान यांना साकुर मोहम्मद आणि लोकेश यादव नावाच्या दोन गुन्हेगारांबद्दल विशेष माहिती मिळाली होती, ज्यांच्यावर खोट्या नोटा चलनात आणल्याचा आरोप आहे.
आरोपी खोट्या नोटांची खेप घेऊन दिल्लीतील अक्षरधाम मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर दिल्लीतील अक्षरधाम मंदिराजवळ सापळा रचून साकूर मोहम्मद आणि लोकेश यादव या आरोपींना पकडण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 6,00,000 रुपयांच्या 500 रुपयांच्या उच्च प्रतीच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या.
चौकशी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे पकडलेल्या खोट्या नोटा राजस्थानमधील त्यांचे सहकारी हिमांशू जैन, शिवलाल आणि त्याचा भाऊ संजय यांच्याकडून मिळाल्याचे उघड झाले. खोट्या नोटांसोबतच पोलिसांनी 2 लॅपटॉप, 3 कलर प्रिंटर, 2 लॅमिनेशन मशीन, 2 पेन ड्राईव्ह, नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे कागदी पत्रे, शाई आणि केमिकल आणि नोटांवरचा 'सुरक्षा धागा' जप्त केला आहे. आरोपी.
ग्रीन फॉइल शीट आणि वापरलेल्या फ्रेम जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींचे मोबाईल हँडसेट, सिमकार्ड, एक क्रेटा कार आणि स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. बनावट नोटांच्या टोळीचा मास्टरमाइंड 25 वर्षीय आरोपी शकूर मोहम्मद हा पदवीधर आहे. तो व्यवसायाने पेंटर होता आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 2015 साली अजमेरला आला होता. त्याने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला खोट्या नोटा छापण्यासाठी ‘फर्जी’ या वेब सीरिजपासून प्रेरणा मिळाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.