बँक ग्राहकांना गंडा घालणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, पोलिसांची तुळजापुरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:04 AM2021-12-02T11:04:21+5:302021-12-02T11:04:40+5:30
Crime News: बँकेतून रक्कम काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हातोहात गंडा घालणाऱ्या रवी गुंज्या (२५, रा. कप्पराल थिप्पा, ता. काविल, जि. बेल्लोर, आंध्र प्रदेश) याच्यासह चौघा जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी तुळजापूर येथे अटक केली.
ठाणे - बँकेतून रक्कम काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हातोहात गंडा घालणाऱ्या रवी गुंज्या (२५, रा. कप्पराल थिप्पा, ता. काविल, जि. बेल्लोर, आंध्र प्रदेश) याच्यासह चौघा जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी तुळजापूर येथे अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाइल, ५० हजारांची रोकड आणि मोटारसायकल असा दोन लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे यांनी बुधवारी दिली.
ठाण्यातील मनोरमानगर येथील रहिवासी प्रमोदकुमार झा (५७) हे मनोरमानगरातील ब्लॉसम हायस्कूलमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबर रोजी या शाळेतील शिक्षकांच्या पगाराची एक लाख ४३ हजार २३० रुपयांची रक्कम वसंतविहार येथील एचडीएफसी बँकेच्या सिद्धांचल शाखेतून काढून ती पिशवीमध्ये ठेवली. हीच पिशवी घेऊन ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रिक्षातून उतरून शाळेत जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरून तोंडाला मास्क लावून आलेल्या दोघा लुटारूंनी त्यांच्याकडील रक्कम असलेली पिशवी घेऊन पलायन केले. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, संजय निंबाळकर आणि निरीक्षक प्रियत्तमा मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे, पोलीस नाईक अभिजित कलगुटकर आणि भरत घाटगे आदींच्या पथकांनी यातील रवी गुंज्या याच्यासह शरीषकुमार पिटला (२९, रा. कप्पराल थिप्पा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश), मोजेस ऊर्फ नानी गोगुला (२७, रा. कप्पराल थिप्पा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) आणि रघुवरण आकुला (२२, रा. आंध्र प्रदेश) या चार जणांच्या टोळीला २९ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून अटक केली. त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून नाशिकमधील तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील एका जबरी चोरीसह सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांनी चौकशीमध्ये मुंब्रा येथील पाच लाख ९५ हजारांच्या दोन चोऱ्या, कामोठे येथील सहा लाख २५ हजारांच्या तसेच तळोजा आणि पनवेल येथील अनुक्रमे दोन लाख ८० हजारांची आणि तीन लाखांची अशा पाच लाख ८० हजारांच्या चोरीचीही कबुली दिली. याशिवाय, त्यांनी कल्याण, डोंबिवली परिसरातही अशाच प्रकारे चोऱ्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरीतील सोन्याचे मंगळसूत्रासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
असा लागला सुगावा
या टोळीने ठाण्यातील प्रमोदकुमार झा यांच्याकडे जबरी चोरी केल्यानंतर ते एका मोटारसायकलवरून पसार झाले होते. त्याच मोटारसायकलीचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तुळजापूरला पळालेल्या या टाेळीचा सुगावा लागला. याच नेल्लोर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारे चोऱ्या करणाऱ्या आणखी काही टोळ्या कार्यरत असल्याचीही माहितीही तपासात समोर आली आहे.