महिनाभर घर भाड्यानं घेऊन टाकायचे दरोडा, आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:50 AM2021-09-20T09:50:53+5:302021-09-20T09:51:20+5:30
इस्लामपूर पोलिसांचे यश, राज्यातील पोलीस होते मागावर
इस्लामपूर (जि. सांगली) : शहरामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असूनसुद्धा चोरट्यांकडून दिवसाढवळ्या रोख रक्कम आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या हातातल्या बॅगा पळवून नेण्याचे प्रकार घडत होते. चार दिवसांपूर्वी बसस्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या युनियन बँकेच्या समोरून ६० हजार रुपयांची रोकड लुटून दुचाकीवरून पलायन करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यात येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यश मिळवले. तब्बल पाच दिवस या टोळीचा माग काढत आंध्र प्रदेश राज्यातील दोघांना कर्नाटकच्या हद्दीवर पथकाने ताब्यात घेतले आहे.
या टोळीने सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड अशा अनेक शहरात उच्छाद मांडला होता. मात्र, आतापर्यंत ही टोळी कोणाच्या हाती लागली नव्हती. पण, त्यांच्या पापाचा घडा इस्लामपुरात भरला. येथील गजबजलेल्या परिसरात चार दिवसांपूर्वी ७३ वर्षांचे वडील आणि त्यांची माहेरी आलेली मुलगी सकाळी ११.३० च्या सुमारास युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. तेथे ६० हजार रुपये काढून ते कापडी पिशवीत ठेऊन दोघे बाहेर आले. ही पिशवी मुलीकडे होती, मात्र मानेवर तिला खाजवू लागल्याने तिने ती पिशवी दुचाकीजवळ खाली ठेवली.तेवढयात पाठीमागून आलेल्या चोरट्याने मानेवर पाणी लावा असे सांगत त्यांना भुलवले आणि ती ६० हजार रुपयांची पिशवी उचलून अन्य दोन साथीदार थांबलेल्या दुचाकीकडे पळ काढत त्यांच्यासोबत पोबारा केला.
या परिसरात पोलिसांनी सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चोरट्यांची छबी त्यात कैद झाली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कामाला लावले. या पथकाने चोरटे गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत तब्बल पाच दिवस त्यांचा माग काढला. इस्लामपूरपासून किणी, वाठार, आष्टा, शिगाव, वडगाव, हातकणंगले, गोकुळ शिरगाव, कागल, कोगनोळी (कर्नाटक) आणि परत असा माग काढत कागल येथे महिनाभर भाड्याने खोली घेऊन राहिलेल्या आंध्रप्रदेश राज्यातील दोघांना ताब्यात घेत ही तपास मोहीम फत्ते केली.
महिनाभर मुक्काम..!
आंध्रप्रदेश राज्यातील चोरट्यांची ही टोळी विभागून राहते. ज्या गावात जातील तेथे फक्त महिनाभर भाड्याने खोली घेऊन मुक्काम ठोकायचा. त्या परिसरात हात मारल्यानंतर तेथून दुसऱ्या शहरात जायचे. त्यामुळे हे चोरटे सहजासहजी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या टोळीने राज्यातील अनेक मोठ्या शहरात दिवसाढवळ्या रोख रक्कमेची लुटालूट केली होती. त्यामुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली होती. मोठ्या शहरातील पोलीसांच्या तपास यंत्रणा या टोळीच्या मागावर असताना इस्लामपूर पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या टोळीचा छडा लावत त्यांच्या कारवायांना पडद्यावर आणण्याचे मोठे काम केले आहे.