शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पोलिसात केली तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 09:32 PM2019-10-09T21:32:45+5:302019-10-09T21:35:44+5:30
विरोधीपक्ष नेत्याविरोधात शहर प्रमुखाची पोलिसात तक्रार
नवी मुंबई - विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी संध्याकाळी ऐरोली येथे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी राजकीय बैठक बोलवली होती. परंतु हि बैठक शिवसेनेची अधिकृत नसल्याचे इतर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावरून शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी त्या बैठकीच्या अनुषंगाने मेसेज तयार करून ते शिवसेनेच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकले होते. याचा जाब विचारण्यासाठी चौगुले यांनी म्हात्रे यांना फोन केला होता. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला असता चौगुले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली असता चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.