इंटरनेट कॉल करून खंडणी मागणं पडलं महागात; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 09:45 PM2019-07-26T21:45:03+5:302019-07-26T21:46:17+5:30
यातील मुख्य मास्टरमाईंड फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पालिसांनी सांगितले.
मुंबई - इंटरनेट कॉल करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव सुफियान अब्दुल खान (२१) असं असून तो कुर्ला पश्चिम येथे येथे राहतो. गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ४ च्या पथकाने याला तक्रारदार महिलेला इंटरनेटद्वारे धमकी देऊन महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीची जलदगतीने माहिती घेऊन दोन आरोपींपैकी एकास अटक केली.
अॅण्टॉप हिल येथील महिलेला वेगवेगळ्या मोबाईल फोन क्रमांकावरून फोन करून ओळख वाढवून तसेच इंटरनेट कॉल करून खंडणीची मागणी करणाऱ्या एका माथेफिरुच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने मुसक्या आवळल्या. तर यातील मुख्य मास्टरमाईंड फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पालिसांनी सांगितले.
अटक केलेल्यामध्ये सुफियान अब्दुल हकीम खान (२१) याचा समावेश आहे. तर यातील मास्टरमाईंड संयुक्त अरब अमिरात कतार येथील आहे. अॅन्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेस अनोळखी व्यक्तीने इंटरनेट कॉल करून तिच्याशी ओळख वाढवून सतत संवाद साधून त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यादरम्यान त्याने महिलेची कौटुंबिक माहिती मिळवली. त्याचबरोबर महिलेचे आक्षेपार्ह फोटो देखील मिळविले. त्यानंतर त्या अनोळखी माथेफिरुने तिच्याकडे ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास तिच्या मुलास जिवे ठार मारण्याची तसेच या महिलेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली.
या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संवेदनशील प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष ४ ने सुरू केला. गुरुवारी यातील आरोपीने पुन्हा फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर कॉल करून तिला धमकावून ३० हजार रुपये घेऊन कुर्ला रेल्वे स्टेशन येथे येण्यास सांगितले. त्याअनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला आणि नमुद खंडणीची रक्कम घेण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात आरोपी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कुर्ला येथे राहणाऱ्या आरोपीकडे केलेल्या अधिक तपासात यातील मुख्य आरोपी हा संयुक्त अरब अमिरात कतार या देशात एक वर्षापासून राहत असून तेथून तो सुत्रे हलवित असल्याचे उघड झाले. यातील सूत्रधार अटक आरोपीस इंटरनेट कॉलद्वारे सूचना देऊन फिर्यादी महिलेकडे खंडणी मागून ती स्वीकारण्यासाठी पाठविल्याचे उघड झाले आहे.