श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 01:54 PM2022-11-26T13:54:39+5:302022-11-26T13:55:37+5:30
रजत हा श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र असून, त्याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत माहिती मिळू शकते. वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रजत याला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली.
वसई : वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत झालेल्या निर्घृण हत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत असून, दिल्ली आणि माणिकपूर पोलिसांचा तपास सुरूच आहे. दरम्यान, वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून श्रद्धाचा कॉलेजचा मित्र रजत शुक्ला याची शुक्रवारी चौकशी करण्यात आली.
रजत हा श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र असून, त्याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत माहिती मिळू शकते. वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रजत याला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली. दरम्यान, आरोपी आफताब पुनावाला हा श्रद्धा हिला सिगारेटचे चटके देत होता, अशीही माहिती पुढे येत आहे. प्रेमात असलेली आणि ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी व्यक्ती मारहाण आणि सिगारेटचे चटके देत असतानाही श्रद्धा त्याच्याबरोबर का राहत होती, असा प्रश्न यानिमित्ताने व्यक्त होत आहे. मात्र, श्रद्धा ही आफताबच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती तसेच तिने आपल्या कुटुंबाबरोबरचे संबंध तोडलेले होते. यामुळे ती मारहाण आणि सिगारेटचे चटके सहन करीतच त्याच्याबरोबर राहत होती. ती त्याला सुधारण्याची एक संधी देऊ पाहत होती, असे तिच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे.
सिगारेटचे चटके -
श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र रजत याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबरचे संबंध तोडून टाकले होते. श्रद्धाने २०२१ मध्ये आपल्या मित्रांना मारहाणीचा आणि सिगारेटचे चटके दिलेला एक फोटो शेअर केला होता. त्यात तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके होते, असे रजतचे म्हणणे आहे. याबाबत अधिक चौकशीसाठी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असल्याचे सांगण्यात आले.