वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; २० कार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:38 AM2021-11-03T07:38:24+5:302021-11-03T07:38:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या २० कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्या होत्या.
जुलै महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात अधिक तपास करून सलग सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून चोरीच्या एकूण २० कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार गुजरात, सुरत, पश्चिम बंगाल, कोलकाता, झारखंड या ठिकाणी विकण्यात आल्या होत्या.
जुलै महिन्यात दोघांना अटक केल्यानंतर त्यांचा सहभाग देशभरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहायक निरीक्षक हर्षल कदम, राजू तडवी, नीलेश पाटील, हवालदार रोहीदास पाटील, विश्वास पाटील, बालाजी चव्हाण आदींचे पथक तपास करत होते. त्यांनी सुरत, कोलकाता व मुंबई याठिकाणी छापे टाकून पाच जणांना अटक केली.
मनीष चोवटिया, जमालुद्दीन शहा, नौशाद अन्सारी, राशिद अली व सुमित जालान अशी त्यांची नावे आहेत, तर मोहंमद तौफिक हबिबुल्ला व मनोज गुप्ता अशी यापूर्वी अटक केलेल्यांची नावे आहेत. तौफिक याच्यावर २७ व मनीष याच्यावर ४४ गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईसह लगतच्या शहरातून वाहनचोरी केल्यानंतर त्यावरील चेसीच्या ठिकाणी नवा नंबर टाकून बनावट कागदपत्रांद्वारे या वाहनांची देशभरात विक्री केली जायचे असे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले. या वेळी अपर आयुक्त महेश धुर्ये, उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनोद चव्हाण उपस्थित होते.