पानटपरीवर नशेच्या गोळ्या; लातूरमध्ये दोघांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 18:28 IST2021-10-02T18:22:44+5:302021-10-02T18:28:29+5:30
Crime News :पाेलीस पथकाचा छापा; पाच दिवसांची काेठडी

पानटपरीवर नशेच्या गोळ्या; लातूरमध्ये दोघांना केली अटक
लातूर : शहरातील औसा राेडवर असलेल्या एका पानटपरीवर विशेष पाेलीस पथकाने छापा मारला़ यावेळी दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६०० गेळ्या आणि इतर साहित्य असा २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शनिवारी पहाटेच्या सुमारास विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असात, पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा राेडवर असलेल्या एका पानटपरीवर दाेघे जण झाेपेच्या, नशेच्या गाेळ्या विक्री करत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पानटपरीवर विशेष पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारला. यावेळी पानटपरीची झाडाझडती घेतली असता झाेपेच्या, नशाकारक गाेळ्या आढळून आल्या़ दरम्यान, पथकाने नशाकारक ६०० गाेळ्या आणि इतर साहित्य असा एकूण २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गाेळ्या झोपेसाठी वापरण्यात येतात. ते अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री अथवा खरेदी करता येत नाहीत. असे असतानाही पानटपरीमधून या गोळ्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले.
पानटपरीमध्ये बसलेल्या जावेद रुकमोदिन शेख (२९), नसीर अल्लाउद्दीन शेख (३१ रा. चांडेश्वर ता. जि. लातूर) यांना अटक करण्यात आली. अधिक चाैकशी केली असता,या गाेळ्या कर्नाटक राज्यामधून एका व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात आल्याचे सांगितले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दाेघांनाही लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.