अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 07:01 AM2024-09-29T07:01:10+5:302024-09-29T07:01:40+5:30
बदलापूरमधील खासगी शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिंदे याचा मुंब्रा बायपासवर पोलिसांवर बंदुकीतून गोळीबार केल्याने पोलिसांनी एन्काउंटर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत पोलिसांनी ठार केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबईतील वकील धनश्याम उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.
बदलापूरमधील खासगी शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिंदे याचा मुंब्रा बायपासवर पोलिसांवर बंदुकीतून गोळीबार केल्याने पोलिसांनी एन्काउंटर केला.
पोलिसांच्या अडचणीत वाढ
मात्र, शिंदे याचा हा फेक एन्काउंटर केल्याचा दावा उपाध्याय यांनी केला. अक्षयच्या वडिलांनीही यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने पोलिसांना अनेक प्रश्न केले.
या याचिकेची सुनावणी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका केली गेल्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कायदेशीर गुंतागुंत वाढणार?
nवकील उपाध्याय यांनी नमूद केले की, एन्काउंटर प्रकरणाचा न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
nयापूर्वी एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, उच्च न्यायालयात शिंदेच्या वडिलांनी हे प्रकरण नेले असताना व सुनावणी सुरू असताना थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका केल्याने कायदेशीर गुंतागुंत वाढण्याची भीती आहे.