आरोपींच्या शोधासाठी ७०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 07:32 AM2021-03-02T07:32:14+5:302021-03-02T07:32:24+5:30
अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके असलेली कार आणि धमकीप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणामागचे गूढ कायम असून, आरोपींच्या शोधासाठी पथकाने आतापर्यंत ७०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके असलेली कार आणि धमकीप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. शिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणाही समांतर तपास करत आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी मुंबईत दाखल झालेली इनोव्हा कार ३ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा ठाण्यात जाताना दिसते. मात्र, त्यानंतर ती कुठे गेली, याबाबत माहिती घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. स्फाेटके असलेली स्कॉर्पिओ अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ पार्क करणारा आरोपी नंतर इनोव्हा कारमधून पसार झाला हाेता.
याप्रकरणी आतापर्यंत ७०० हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी जैश उल हिंद या संघटनेच्या माध्यमातून टेलिग्रामवर एक पोस्ट टाकून या प्रकरणाची जबाबदारी घेण्यात आली. मात्र, त्यानंतर संध्याकाळपर्यंत जैश उल हिंदने हे कृत्य केले नसून, आमच्या नावाचा वापर केल्याचे सांगत याबाबतची एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे तपास भरकटविण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच यातील पहिल्या पोस्टमध्ये बीटकॉइनद्वारे पैशांची मागणी करुन त्याखाली एक लिंक देण्यात आली होती.
पोस्ट फेक असल्याचा पाेलिसांचा संशय
nपहिल्या पोस्टमध्ये दिलेल्या लिंकबाबतही गुन्हे शाखेने तपास केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.
nत्यावरून ही पोस्ट फेक असल्याचा संशय पोलिसांकड़ून वर्तविण्यात येत आहे. पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत.