कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडेंविरोधातील तपास दिल्लीला वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:32 AM2024-02-14T06:32:34+5:302024-02-14T06:33:21+5:30
शुक्रवारपर्यंत ईडीने मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले
मुंबई - एनसीबीचे मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर मनी लाँड्रिगचा दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबईवरून दिल्लीला वर्ग करण्यात आला, अशी माहिती ईडीने मुंबई उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.
समीर वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात येण्याऐवजी दिल्ली उच्च न्यायालयात जावे, असे ईडीतर्फे ॲड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.
कुहेतूने दिल्लीला तपास वर्ग करण्यात आला आहे, असा युक्तिवाद समीर वानखेडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अबाद पोंडा यांनी न्या. प्रकाश नाईक व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे केला.
याचिकेवर १५ फेब्रुवारीला सुनावणी
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात न गोवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करत सीबीआयने गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने वानखेडे यांच्यावर ईसीआयआर दाखल केला. हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शुक्रवारपर्यंत ईडीने मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र, याचिका दाखल करण्यात आल्यानंतर तपास दिल्लीला वर्ग करण्यात आला. वानखेडे यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊ नये, यासाठी तपास वर्ग करण्यात आला. उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे, असे पोंडा यांनी सांगितले.