पोलीस आयुक्त संजय बर्वे अडचणीत; कुटुंबाला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:09 AM2020-02-14T06:09:45+5:302020-02-14T06:10:27+5:30
महासंचालकांकडून अहवाल मागविला; पत्नी, मुलाच्या कंपनीला सरकारी कामाचे कंत्राट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या महिनाअखेर सेवानिवृत्त होत असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्नी व मुलाच्या कंपनीला मिळालेल्या सरकारी कामाच्या कंत्राटाबाबत सरकारला माहिती न कळविल्याप्रकरणी त्यांची पोलीस महासंचालकांकडून चौकशी केली जाईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याबाबतचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे सांगितले.
मुंबई आयुक्तपदी दोन टप्प्यांत सहा महिने मुदतवाढ मिळालेले बर्वे यांची २९ फेबु्रवारीला मुदत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा विषय उपस्थित झाल्याने पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विधानसभा निवडणूक लागू होण्याच्या काही दिवस आधी बर्वे यांचे पुत्र सन्मुख व पत्नी शर्मिला यांच्या भागीदारीतील क्रीस्पक्यू या सॉफ्टवेअर कंपनीला सरकारी दस्तावेजाचे ‘डिजिटायझेशन’ करण्याचे काम मिळाले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. मात्र सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबीयाला काम देण्यात आल्याने नागरी सेवा शर्तीचा भंग झाल्याचा आरोप होत आहे, त्याबाबत बर्वे यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्याकडून त्याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, मुलाच्या कंपनीला सरकारी कंत्राट मिळाले, मात्र कंत्राटाचे काम विनामोबदला केले जाणार होते. त्यात कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नाही, असा खुलासा बर्वे यांनी एका वृत्तसंस्थेला केला आहे.