IPL क्रिकेट सट्ट्यातील मुख्य सूत्रधारांना नागपुरात अटक; दोन दिवसांचा पीसीआर, दोन मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 06:23 PM2020-10-11T18:23:22+5:302020-10-11T18:23:31+5:30
अमरावती गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळच्या क्रिकेट बुकीचा अमरावतीतील अड्डा बुधवारी उद्धवस्त करून पाचपैकी चौघांना अटक केली. या सट्ट्यातील मुख्य बुकी तथा सूत्रधार नागपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आणखी दोघांना नागपुरातून शनिवारी अटक केली. त्यांना दोन दिवसांची (पीसीआर) पोलीस कोठडी मिळाली.
मुख्य सूत्रधार, सुमित शंकर नागवाणी (३५, रा. पिरामीड सिटी फ्लॅट क्रमांक २०४ जरीपटका नागपूर), रॉकी रमेशलाल अलवाणी (३३, रा. जरीपटका, नागपूर), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महागडे मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व पथकाने केली. आयपीएल क्रिकेटच्या बुकी यवतमाळ, अकोला, अमरावतीसह नागपुरात कनेक्शन असल्याचे या कारवाईतून उघड झाले. शहरातील खोलापुरीगेट ठाण्यांतर्गत साईनगरनजीकच्या विश्रामनगरातील रागेश्री अपार्टमेंटमधील अवघड यांच्या फ्लॅटमध्ये पथकाने ७ ऑक्टोबरच्या रात्री धाड टाकून चौघांना अटक केली. त्यांकडून ६ लाख ६५ हजार २९० रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले.
याप्रकरणी रमेश सुगनचंद कटारीया (४१), अविनाश विजयकुमार प्रेमचंदाणी (४६, दोन्ही रा. वैद्यनगर, सिंधी कॅम्प आर्णी रोड यवतमाळ), आकाश राजू विरखेडे (२४, रा. एकतानगर वाघापूर, यवतमाळ), राजकुमार ईश्वरलाल गेही (४०, सिंधी कॅम्प अकोला) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून नगदी ५९,४६० रुपये, १२ मोबाईल, कार, दुचाकी, लॅपटॉप असा एकूण ६ लाख ६५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच सुरेश महादेवराव अवघड याने आयपीएल जुगार सट्टा खेळण्याकरिता स्वत:चा फ्लॅट उपलब्ध करून दिल्याने मुख्य आरोपी व फ्लॅट मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. चारही आरोपींना ११ आॅक्टोंबरपर्यंत पीसीआर मिळाला. दरम्यान अटकेतील आरोपींनी मुख्य सूत्रधार नागपुरात असल्याची कबुली दिली. मुख्य बुकीकडून गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग व राज्यात कुठेकु ठे आयपीएल सट्ट्याचे कनेक्शन आहे, याचा शोध पोलीस घेत आहे.