Sara Khadem: "देशात परत आलीस तर परिणाम वाईट होतील", २५ वर्षीय साराला फोनवरून धमकी, नक्की काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:48 PM2023-01-05T19:48:16+5:302023-01-05T19:51:47+5:30

सारा ही एक बुद्धिबळपटू असून तिला धमकी देण्यात आली आहे

Iran chess player Sara Khadem gets life threat warning on phone if she returns back to home country read details | Sara Khadem: "देशात परत आलीस तर परिणाम वाईट होतील", २५ वर्षीय साराला फोनवरून धमकी, नक्की काय आहे प्रकरण...

Sara Khadem: "देशात परत आलीस तर परिणाम वाईट होतील", २५ वर्षीय साराला फोनवरून धमकी, नक्की काय आहे प्रकरण...

googlenewsNext

Sara Khadem: इराणमध्ये हिजाबचा वाद खूपच वाढला आहे. इराणमध्ये लागू करण्यात आलेल्या कठोर ड्रेस कोडला महिलांसह अनेक लोक सातत्याने विरोध करत आहेत. क्रीडाविश्वही याबाबत तीव्र भावना व्यक्त करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या फुटबॉलच्या फिफा विश्वचषकात इराणच्या संघाने आपल्या सरकारच्या निषेधार्थ सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. आता बुद्धिबळाच्या खेळातही हा हिजाबचा वाद चव्हाट्यावर आला आहे. इराणची महिला बुद्धिबळपटू सारा खादेम हिने एका स्पर्धेत हिजाबशिवाय सामना खेळला. त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून इराणचे चाहते संतापले असून सरकारने साराला थेट धमकीच दिल्याची घटना घडली आहे.

FIDE वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप गेल्या आठवड्यात कझाकिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २५ वर्षीय सारा ही हिजाबशिवाय सामना खेळली. इराणच्या नियमानुसार, देशाच्या प्रत्येक महिला आणि मुलीला देशांतर्गत असो किंवा परदेशात असो, सर्वत्र हिजाब घालणे बंधनकारकच आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सारा खादेम हिला फोन करून धमकी देण्यात आली आहे. तसेच स्पर्धेनंतर तिला आपल्या देशात परत न येण्यास सांगण्यात आले आहे आणि देशात परतलीस तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे.

सारा खादेमचे कुटुंब आणि नातेवाईक अजूनही इराणमध्ये आहेत. त्याला धमकीही देण्यात आली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी अद्याप काहीही सांगितलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणला परतण्याऐवजी ती स्पर्धा संपल्यानंतर मंगळवारी (३ जानेवारी) स्पेनला पोहोचली. फोनवर धमक्या आल्यानंतर कझाकिस्तान सरकारने साराला सुरक्षा पुरवली. तिच्या हॉटेलरूम बाहेर ४ सुरक्षारक्षकही तैनात केले गेले. त्यामुळे आता सारा परत मायदेशी कधी जाणार, पुढे काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

दरम्यान, साराने २०१७ मध्ये फिल्ममेकर आणि शो प्रेझेंटर अर्देशीर अहमदीशी लग्न केले होते. सारा अतिशय मॉडर्न विचारांची आहे. हिजाब परिधान न करतानाच ती तिचे अनेक फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला काही लोकांकडून टीका सहन करावी लागते, पण तिचे चाहते मात्र कायम तिच्या फोटोंना लाईक करतात.

Web Title: Iran chess player Sara Khadem gets life threat warning on phone if she returns back to home country read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.