आयरीश युवती हत्या प्रकरण : आरोपी विकट भगतचा महिनाभर कोंडमारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:25 PM2019-11-05T17:25:40+5:302019-11-05T17:34:04+5:30
तुरुंग महानिरीक्षकांचा आदेश : शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान
मडगाव - तीन वर्षापूर्वी आयरीश युवती डेनियली मॅक्लॉग्लीन हिच्या खून प्रकरणात अटक झाल्यामुळे कुचर्चेत आलेल्या विकट भगत या काणकोणच्या युवकाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तो स्थानबद्ध असलेल्या कोलवाळ तुरुंगात शोध कार्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अटकाव केल्याच्या आरोपाखाली तुरुंग महानिरीक्षकांनी त्याला तब्बल एक महिना वेगळ्या खोलीत कोंडून ठेवण्याचा आदेश दिला आहे. भगत याच्यावर आयरीश युवतीवर बलात्कार करुन नंतर तिचा खून केल्याचा आरोप आहे.
आरोपी विकट भगत याने आपल्याला दिलेल्या या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून यासंबंधी आता 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे, असा आव्हान अर्ज हाताळण्याचे अधिकार सत्र न्यायालयाला आहेत की नाहीत यावर त्या दिवशी युक्तीवाद होणार आहे. तीन वर्षाआधी काणकोण येथे एका आयरीश युवतीवर बलात्कार करुन नंतर तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात भगत याला अटक केली असून सध्या तो कोलवाळ तुरुंगात स्थानबद्ध आहे. त्याच्या विरोधात खुनाच्या खटल्याची सुनावणी सध्या चालू आहे. या खून प्रकरणाचे पडसाद त्यावेळी संपूर्ण जगभरात उमटले होते. याची दखल घेत हा खटला कशाप्रकारे चालू आहे हे पहाण्यासाठी आयरीश दुतावासाने गॅरी कॅली या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
24 ऑक्टोबर रोजी तुरुंग अधिक्षक हेमंत कुमार यांनी राखीव पोलीस दलाच्या सहाय्याने कोलवाळ तुरुंगावर धाड घालून कैद्याकडे असलेले 67 मोबाईल, एक किलो गांजा व 200 विडय़ांची बंडले जप्त केली होती. यावेळी घेतल्या जाणाऱ्या झडटीला विकटने विरोध करुन शोध कामातील कर्मचाऱ्यांकडे तो उद्धटपणो वागल्याचा ठपका ठेवून तुरुंग निरीक्षक कुमार यांनी त्याला एक महिना कोंडून ठेवण्याची शिक्षा दिली होती.
या आदेशाला भगत याने सत्र न्यायालयात आव्हान दिले असून ज्यावेळी झडटी घेतली गेली त्यावेळी आपण स्थानबद्ध असलेल्या कक्षात कुठलीही निषिद्ध वस्तू सापडली नाही असा दावा करुन असे असूनही विनाकारण आपल्याला शिक्षा ठोठावल्याचा दावा केला आहे. भगत याच्याबाजूने बाजू मांडणाऱ्या वकिलानी 2006 च्या तुरुंग कायदा नियमाप्रमाणो कुठल्याही कैद्याला जास्ती जास्त 14 दिवस अशी शिक्षा देता येते. मात्र तुरुंग महानिरीक्षकांनी तब्बल एक महिना ही शिक्षा दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता यांनी अशा प्रकरणात केलेले अपील सत्र न्यायालयापुढे करता येते का हे स्पष्ट करण्यासाठी 8 नोव्हेंबरपर्यंत वेळ मागून घेतला. यावेळी आयरीश दुतावासाचे अधिकारी गॅरी कॅली हेही उपस्थित होते.