डॉक्टर, NIA तर कधी PMO अधिकारी; तरुणाने केली महिलांची फसवणूक, असा अडकवायचा जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:36 PM2023-12-18T14:36:42+5:302023-12-18T14:45:07+5:30
एका व्यक्तीने कधी डॉक्टर, कधी NIA तर कधी PMO अधिकारी असल्याचं सांगून अनेक महिलांची फसवणूक केली आहे.
देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने कधी डॉक्टर, कधी NIA तर कधी PMO अधिकारी असल्याचं सांगून अनेक महिलांची फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) काश्मीरमधील एका व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने पीएमओ अधिकारी आणि लष्करी डॉक्टर असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.
एसटीएफ आयजीच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या व्यक्तीचे पाकिस्तानमधील अनेक लोकांशी आणि केरळमधील संशयित घटकांशी संबंध आहेत. याने अनेक राज्यांमध्ये अनेक महिलांशी लग्नही केलं आहे. एसटीएफने शुक्रवारी (15 डिसेंबर) सय्यद ईशान बुखारी उर्फ डॉ. बुखारी नावाच्या आरोपीला जाजपूर जिल्ह्यातील नेउलपूर गावातून अटक केली.
आरोपी स्वतःला न्यूरो स्पेशालिस्ट, आर्मी डॉक्टर, पीएमओमधील अधिकारी, एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहकारी म्हणून सांगत असे. बनावट वैद्यकीय पदवी देखील त्याने घेतली होती आणि अनेक बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याशिवाय आरोपींकडून अनेक बाँड, एटीएम कार्ड, चेक, आधार कार्ड आणि व्हिजिटिंग कार्डही जप्त करण्यात आले आहेत. आयजीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशासह भारताच्या विविध भागांतील सहा-सात महिलांशी लग्न केल्याचंही उघड झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.