अर्णब गोस्वामींसह अन्य आरोपींविरोधात वॉरंट काढा; सरकारी वकिलांचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:08 AM2021-01-09T06:08:07+5:302021-01-09T06:08:32+5:30
Anvay naik Case: पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अलिबागच्या न्यायालयात गुरुवारपासून सुरू झाली आहे. सुनावणीला हजर राहण्याचे आदेश असतानाही आरोपी अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सारडा हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढावे, अशी विनंती न्यायालयाला केली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी यांनी ‘लोकमत’ला दिली.
गोस्वामी यांना न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे, असेही साळवी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आता ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत. अर्णब गोस्वामी हे दिल्ली येथे आहेत. कोरोना नियमांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने ही विनंती मान्य केली.
वकीलपत्रावर आरोपींच्या सह्याच नाहीत
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. आरोपींच्या वकिलांनी दाखल केलेल्या वकीलपत्रावर आरोपीची सही नाही. आरोपी वकिलाच्या अर्जावर आम्ही हरकत घेऊ याची कल्पना वकिलांना नव्हती. त्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट काढा, असा अर्ज केला आहे.